Bookstruck

राज्याच्या दरबारात 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘ही घ्या जादूची कांडी. ‘चल चल चल चल; चल चल चल चल; चल चल चल चल; असे कांडी फिरवीत म्हणा. प्राचीन काळापासूनच्या सर्व सुंदर स्त्रिया एकामागून एक पडदयावर दिसतील व नाहीशा होतील; परंतु एक धोक्याची सूचना लक्षात ठेवा.’

‘कोणती?’

‘त्या स्त्रियांची चित्रे पडदयावर पाहाताना तुम्हाला मोह नाही पडता कामा. नाही तर एखादया सुंदर स्त्रीचे लावण्य बघाल व तुम्ही लाळ घोटू लागाल. ‘किती सुंदर, खरेच. किती सुंदर.’ वगैरे शब्द तोंडातून बाहेर पडता कामा नयेत. केवळ अलिप्त व अनासक्त रीतीने सारे काम करा.’

‘हो समजले. जातो मी.’

‘सैतानास प्रणाम सांगा.’

‘बरे.’

माधव आला. त्याने राजाला तयार असल्याचे कळविले. दिवस ठरला. त्या दिवशी रात्री हा प्रयोग व्हावयाचा होता. सारा मंडप भरला. उच्चासनावर राजा बसला होता. सरदार, दरकदार, इनामदार, जहागीरदार बसले होते. सामान्य जनताही बसली होती. एकीकडे स्त्रिया होत्या. सर्वांचे डोळे अधीर झाले. समोर रूपेरी पडदा होता. माधव बाजूला येऊन उभा राहिला. टाळयांचा कडकडाट झाला. सारे शांत झाले.

माधव कांडी फिरवू लागला. पडद्यावर लावण्यमयी मूर्ती दिसू लागल्या. प्रत्येकीचे नावही लिहिले जाई. सीता, सावित्री, द्रौपदी, दमयंती, रूक्मिणी, मंदोदरी पडद्यावर आल्या व गेल्या, संयुक्ता व पद्मिनी चमकल्या. नूरजहान व मुमताजमहल दिसल्या. हेलेन दिसली. सर्व देशातील सौदंर्य-रमणी येत होत्या व जात होत्या.

परंतु एक चित्र आले. अतिमोहक असे ते सौंदर्य होते. माधवाच्या हातातील कांडी थांबली. तो त्या चित्राकडे पाहू लागला. ‘काय सुंदर! ओहो! किती खुबसुरत!’ असे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले. तोच कडाड्कडाड् असा आवाज झाला. जणू शेकडो बाँबगोळेच पडले. राजा नि प्रजा, कोठे गेले सारे? कोठे गेला तो देखावा? कोठे गेली ती राजधानी? कोठे गेला तो माधव? कोठे गेला सैतान? त्यांचे का तुकडे झाले? त्यांच्या का ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या? भयंकर आवाज!

« PreviousChapter ListNext »