Bookstruck

सत्यनारायण 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘तू शहाणा झालास आता. कर तुला योग्य वाटेल ते.’

येसनाक रामरावांच्या घरी जायला निघाला तो त्याला शेतातच ते दिसले. बरोबर प्रेमळ प्रेमाही होती.

‘रामराम.’ येसनाक म्हणाला.

‘रामराम, बरा आहेस ना रे. तू पलटणवाला आहेस. चाकरमन्या तू.’ रामराव म्हणाले.

‘दादा, तुम्हाला एक विचारायला आलो आहे.’

‘काय रे?’

‘आज बाबा करणार होते सत्यनारायण; परंतु वर आभाळात देव भरून आला आहे. तुमच्या वाड्यात द्याल जागा पूजेला?’

‘हो, हो. आमच्या वाड्यात या. दिवाणखान्यात पूजा मांडू. मी परवाच झाडून ठेवला आहे. हंड्यातून मेणबत्त्या लावू. मजा होईल नाही, बाबा?’

‘दादा, सांगा ना.’

‘हे बघ येश्या, आमच्याकडे तुमचा सत्यनारायण केलात, तर भटजी पूजा सांगायला येणार नाहीत.’

‘मी सांगेन पूजा. मराठी तर असते. ये रे येसनाका. मी पूजा सांगितली तर का चालणार नाही? मी वाचीन, नाही तर बाबा वाचतील.’

‘मी भटजींना जाऊन विचारतो. न आले तर तुम्हीच सांगा पूजा, तुम्हाच कथा वाचा.’

‘आणि तुम्हा भजन करा. मी पेटी वाजवीन. मीसुद्धा अभंग म्हणेन. रात्री कॉफी करू. आज मजा, आनंद. नाही बाबा?’

‘परंतु सनातनी लोक रडवतील मागून.’ रामराव गंभीरपणे म्हणाले.

‘परंतु सत्यनारायण हसवील! सत्यनारायणापेक्षा का ह्या रूढीवाल्यांची शक्ती अधिक आहे?’ येसनाक म्हणाला.

येसनाक गावात गेला. त्याने पांडूभटजींस विचारले.

‘ह्या भ्रष्टाकारात मी सामील होणार नाही. सत्यनारायण उद्या करा. आजच का अडले आहे?’

‘मनात येताच पूजा करावी. उद्याचा काय भरवसा? शिवाय उद्या मला परत गेले पाहिजे. रजा संपते. सांगा. याल ना?’

« PreviousChapter ListNext »