Bookstruck

सत्यनारायण 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘नाही, मी येणार नाही. हे पाप करू नका. तो रामराव जागा देऊन अधर्म करायला तयार झाला तरी तुम्ही अधर्म करू नका.’

‘मला धर्म अधर्म समजतो.’

‘मग भटजीकडे कशाला आलास? पलटणीत धर्म शिकवतात वाटते?’

‘माणुसकीचा धर्म शिकवावा लागत नाही. खोटे धर्म शिकवावे लागतात. बरे बसा. मी जातो.’

येसनाक रामरावांना सांगायला पुन्हा शेतावर आला. प्रेमा फुले तोडत होती.

‘ही बघ गुलाबाची फुले. ही शेवंतीची. येणार का भटजी?’ प्रेमाने विचारले.

‘नाही येणार.’

‘मग आज बाबा भटजी होतील. ते पूजा सांगतील व मी कथा वाचीन.’

‘वा. छान!’

‘ठरले ना बाबा? हो ठरलेच. जा रे येसनाक. सा-यांना बोलव.ट

रामराव बोलत नव्हते. प्रेमाने फुलांची परडी भरून घेतली. तिने पित्याचा हात धरला. दोघे घरी आली.

‘आई, आपल्याकडे आज सत्यनारायण आहे; भरपूर प्रसाद कर.’

‘कसला सत्यनारायण?’

‘तुझ्या प्रेमाच्या लग्नाचा.’

‘चावट आहेस. नीट बोल.’

प्रेमाने सारी हकीगत सांगितली.

‘प्रेमा, आपल्यावर बहिष्कार पडेल.’

‘परंतु देवाची कृपा होईल.’

इतक्यात रामरावही आले. प्रेमा पळाली. ती दिवाणखान्यात तयारी करू लागली. रामरावांनी सगुणाबाईंची समजूत घातली. त्या तयार झाल्या. विठनाक व येसनाक आले. त्यांनी साखर, तूप, रवा, केळी वगैरे सामान आणून दिले.

‘अरे सामान कशाला?’ रामराव म्हणाले.

‘वा:, आमचा सत्यनारायण. तुमचे सारे घेऊन कसे चालेल?’ विठनाक म्हणाला.

« PreviousChapter ListNext »