Bookstruck

पित्याची शेवटची देणगी 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आणि त्याच दिवशी रात्री तिला तिकीट काढून देण्यात आले. बायकांच्या डब्यात ती एकटी बसली होती. गाडी सुटली. ती रडत होती. काय करावे तिला समजेना. परंतु मरावयाचे तर धैर्य नव्हते. पुरुषांबरोबर आपण अशा कशा अबला ठरतो असे तिच्या मनात एकदम आले. आपण अन्यायाला प्रतिकार का करू नये? आपण मान उंच का करू नये ? तिची तिला लाज वाटत होती. आपण डॉक्टर होऊ, मिशनरी बायांप्रमाणे दवाखाना घालू, असे म्हणत असू; परंतु माझी ही दशा, असे मनात येऊन ती पुन्हा रडू लागली.

ती शिवतरला आली. ती उपाशी होती. तिकिटाहून अधिक पैसे तिच्याजवळ नव्हते. स्टेशनवरून आपल्या गावी ती पायी आली.

‘कोण प्रेमा?’ रामराव आश्चर्याने म्हणाले.

‘होय, तुमची अभागी प्रेमा.’ ती रडत म्हणाली.

‘आणखी कोण आहे बरोबर?’

‘मी एकटीच आल्ये.’

‘का?’

‘त्यांनी पाठविले, हाकलले म्हणून.’

सगुणाबाई बाहेर आल्या. प्रेमा घरात गेली. तिने सारी हकीगत सांगितली. आईबापांना वाईट वाटले; परंतु करणार काय?’

‘आई, मी सांगत होते लग्न नको म्हणून. आता केलीत मला गाय. तुम्हाला दु:ख व मला दु:ख.’

‘प्रेमा, नशिबात असते ते का टळते? हेही दिवस जातील, तुझ्या पतीला शुद्ध येईल. तू आपले शील सोडू नकोस. तू सत्त्वाला जाग.’

‘पुन्हा पुन्हा दागिन्यांसाठी तो मला माहेरी पाठवतील. नाही तर मारतील.’

‘तुला देणार आहोत हो दागिने. ही माझी कुडी घेऊन जा. माझे गोठ घेऊन जा. माझ्या हातांत नसले तरी चालेल. मला आता थोडेच मिरवायचे आहे. उगी. रडू नको.’

काही दिवसांनी प्रेमा पुन्हा सासरी आली. तिची कुडी, गोठ, वगैरे पाहून श्रीधर आनंदला. त्याने ताबडतोब ते दागिने काढून घेतले. मध्यंतरी त्याची ती मडमिणी कोठे गावाला गेली. श्रीधर आता घरातच असे. लहर लागली तर जरा गोड बोले.

« PreviousChapter ListNext »