Bookstruck

ना सासर ना माहेर 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

काही महिने बरे गेले. परंतु त्याची प्रियकरीण आली परत. श्रीधर पुन्हा घरी फारसा येईनासा झाला. प्रेमाची कुरतओढ पुन्हा सुरू झाली. तिला आता काही दिवस गेले होते.

‘माहेरी जा बाळंतपणाला. बाळलेणे करून घेऊन ये. तूही नवीन एखादा ठसठशीत दागिना आण. तुझा बाप कंजूष दिसतो. वाडा तर मोठा आहे म्हणतेस. विका ना म्हणावं वाडा.’ सासू एके दिवशी म्हणाली.

बाळंतपणासाठी प्रेमाची माहेरी रवानगी झाली. आईजवळ नवीन होणारी आई आली. एके दिवशी प्रेमा प्रसूत झाली. तिला मुलगी झाली. तिचे नाव सरोजा ठेवण्यात आले. मुलगी खरोखरच सुंदर होती. हळुहळू हाताच्या मुठी करू लागली. रांगू लागली. बाळसे येऊ लागले. सरोजा. खरेच, ती सरोजाप्रमाणे, कमळाप्रमाणे, सुंदर टवटवीत दिसत होती.

‘बेबी सरोजा.’ आजी प्रेमाने म्हणे.

‘नुसते सरोजा नाही वाटते म्हणायचे?’ रामराव विचारीत.


‘बेबी सरोजा असेच म्हणायचे.’

रामरावांनी प्रेमाला नवीन दागिने करून दिले. सुंदर पातळे घेऊन दिली. बेबी सरोजाला सारे बाळलेणे करून दिले.

‘बाबा, इतके हे सारे कशाला?’

‘बेटा, ही शेवटची देणगी. आता तुझ्या पित्याजवळ काही शिल्लक नाही. हा वाडाही आता आपला नाही. मी कर्जबाजारी आहे. आम्हालाही परागंदा व्हावे लागेल. सनातनी बंधूंची इच्छा पूर्ण होईल; प्रेमा आता दागिन्यांसाठी पुन्हा नको येऊ हो. तुझ्या पित्याजवळ आता काही नाही.’

‘बाबा, नुसती भेटायला आल्ये तर चालेल ना?’

‘नुसती भेटायला ये; परंतु आम्ही कोठे असू? रानावनात असू. तेथे ये. मला सदैव देता येईल; परंतु पैसा कोठून आणू?’

बेबी सरोजाला घेऊन प्रेमा पुन्हा सासरी यायला निघाली. तिचे हृदय दु:खाने भरून आले होते.

« PreviousChapter ListNext »