Bookstruck

आत्याचे निधन 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘आत्या, तेथे एक गृहस्थ होते. साधूसारखे दिसत होते. त्यांच्या चर्येवरून ते सज्जन व दयाळू दिसत होते. डोळे मिटून ते बसले होते. त्यांच्या समोर मी सरोजाला ठेवले व निघून आल्ये.’

‘त्यांनी ती मुलगी उचलली?’

‘हो. मी पाहिले आणि मग मी निघून गेल्ये.  शिकल्ये. नर्स झाल्ये. दवाखान्यात राहिल्ये. तुझी माझी गाठ पडली; परंतु सरोजा मला कोठे भेटेल? सारखी तिची आठवण येते मला.’

‘आपण जाहिरात देऊ.’

‘परंतु सरोजाला नेणा-या त्या माणसाला कसे कळणार?’

‘कळेल. हल्लीचे लोक वर्तमानपत्रे वाचतात. जाहिरीती तरी वाचतात.’

‘परंतु आत्या जाहिरात दिली तर माझ्या पतीलाही कळेल. तोही माझ्या शोधात असेल. मी एकदम श्रीमंत झाले आहे हे कळले तर तोही येईल. पुन्हा माझी सरोजा मग भिकारी होईल. इतक्यात जाहिरात नको.’

‘आपण यात्रेलाच जाऊ चल. कोठेतरी प्रवास करून येऊ. तुला बरे वाटेल. पवित्र, सुंदर स्थळे पाहिली म्हणजे मनाला शांत वाटते.’

‘उन्हाळा आला म्हणजे जाऊ. महाबळेश्वरला किंवा माथेरानला जाऊ. चालेल?’

परंतु उन्हाळा येण्याच्या आधीच आत्या आजारी पडली. बरीच आजारी पडली. तिला उठवेना.

‘आत्या, दवाखान्यात जायचे का?’

‘नको. तू आहेस ना येथे. आणखी कशाला दवाखान्यात? तुझ्यासारखी शुश्रूषा कोण करील? डॉक्टर येतच आहेत. तुझ्याजवळ मरू दे. आता तू कोठे जाऊ नकोस माझ्याजवळून. मी एकटी असल्ये की, मला भीती वाटते.’

प्रेमा सारखी आत्याजवळ बसून असे. आत्याची सेवा ती मनापासून करीत असे. आत्याला गीता वाचून दाखवीत असे. गाणी, अभंग म्हणत असे. एके दिवशी एक अभंग म्हणून प्रेमा म्हणाली –

‘हा बाबांचा आवडता अभंग हो आत्या.’

« PreviousChapter ListNext »