Bookstruck

आत्याचे निधन 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘होय. हा अभंग त्याला फार आवडे. मलाही आठवते. म्हण, पुन्हा एकदा म्हण.’ प्रेमाने पुन्हा तो अभंग म्हटला :

‘आतां तरी पुढे हाचि उपदेश
नका करू नाश आयुष्याचा
सकलांच्या पाया माझे. दंडवत
आपुलालें चित्त शुद्ध करा
हित ते करावे देवाचे चिंतन
करूनिया मन एकविध
तुका म्हणे हित होय तो व्यापार
करा, काय फार शिकवावें’

‘प्रेमा, किती सुरेख अभंग.’

‘होय आत्या. आपले चित्त शुद्ध करणे याहून अधिक महत्त्वाचे काय?’

‘प्रेमा, तू माझी गादी स्वच्छ करतेस, रोज माझे अंग स्वच्छ करतेस. माझे कपडे बदलतेस; परंतु माझे मन मलाच स्वच्छ करायला हवे. नाही का?’

‘होय आत्या.’

‘परंतु प्रेमा, तुझ्या संगतीत राहून माझे मनही शुद्ध झाले. दवाखान्यातील तुझी सेवा पाहून माझ्या मनावर परिणाम होई. श्रीमंतीचा गर्व कमी होई. हृदयाची श्रीमंती नसेल, तर पैशाची श्रीमंती म्हणजे स्वत:ला व जगाला एक शापच आहे.’

‘आत्या, पैसा काय किंवा काही काय, उपयोग करणा-यावर सारे आहे. पाण्याने डासही होतात. फुलेही फुलतात. विस्तवाने स्वयंपाकही होतो, आगही लावता येते. पैशाने जगाचा दुवाही घेता येतो, जगाचे शिव्याशापही घेता येतात.’

‘प्रेमा, या दुखण्यातून मी काही वाटणार नाही. ही सारी इस्टेट तुझ्या नावाने करून ठेवते. तुला सारी इस्टेट बक्षीस. सारे शेअर्स, पैसे, हा बंगला, सारे तुझ्या नावाने करून ठेवायला हवे. मी वकील बोलावले आहेत. ते येतील. तू योग्य तोच उपयोग करशील. संस्था काढ. काही कर. तुझी सरोजा सापडली तर तिला तू दे. तुझा पती पश्चात्ताप होऊन आला तर सारेच गोड होईल. मला आशा आहे की, तुझा पती तुला मिळेल. तुझी बेबी सरोजा तुला भेटेस.’

‘आणि बाबा?’

« PreviousChapter ListNext »