Bookstruck

आत्याचे निधन 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘तो विरक्त होऊन गेला असेल. हिमालयात बसला असेल.’

‘हिमालयात नाही जाणार. बाबाही भेटतील. आत्या, एक गोष्ट तुला सांगू?’

‘कोणती बाळ?’

‘ज्या गृहस्थांसमोर मी सरोजाला ठेवले ते बाबाच होते!’

‘काय माझा रामराव? माझा भाऊ!’

आत्याने एकदम उठून विचारले.

‘होय आत्या.’

‘तू हे इतके दिवस का नाही सांगितलेस? माझ्या सहीची जाहिरात दिली असती. बहिणीला भेटायला भाऊ आला असता.’

‘आत्या, मला भीती वाटत होती. बाबा फार करारी आहेत. त्यांनी तुम्हाला आफ्रिकेत परत पत्र पाठविले नाही. मलाही बाळंत होऊन सासरी जाताना म्हणाले, आता माहेरी पुन्हा येऊ नकोस आणि त्यांनी मला त्यानंतर पत्रही पाठविले नाही. आई वारल्याचेही कळविले नाही. असे आहेत बाबा. जाहिरात देऊनही ते न येते, तर तुला अधिक वाईट वाटले असते. म्हणून मी बोलल्ये नाही; परंतु तुझ्या निरवानिरवीच्या गोष्टी चालल्या असताना तरी तुझ्यापासून काही लपवून ठेवू नये म्हणून मी आता हे सांगितले. आत्या, रागावू नको माझ्यावर.’

‘नाही हो बाळ. तुझ्यावर कशी रागावू? सारे जग तुझ्यावर रागावले आहे. आणखी मी का रागावू? आणि आयुष्याच्या अखेरच्या क्षणी का रागावू? सर्वांना प्रेम देण्याची ही वेळ. खरे ना?’

आत्याने पुढे बक्षीसपत्र करून ठेवले. सारी संपत्ती तिने प्रेमाला दिली. प्रेमा लक्षाधीश झाली.

आत्या क्षीण होत चालली. खंगत चालली.

‘प्रेमा, तुझी मांडी दे. मांडीवर घे माझे डोके.’

प्रेमाने मांडीवर आत्याचे डोके घेतले. डॉक्टर येऊन गेले. नोकरचाकर खिन्न होऊन बसले होते.

प्रेमा गीता म्हणत होती. गीता ऐकता ऐकता आत्याने राम म्हटला.

« PreviousChapter ListNext »