Bookstruck

सत्याग्रहात 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रेमाची शिक्षा संपली. ती मुंबईस आपल्या बंगल्यावर आली. वकीलाने श्रीधरही तुरुंगात असल्याचे सांगितले.

‘तुरुंगात?’

‘हो!’

‘कशासाठी?’

‘सत्याग्रहासाठी.’

‘श्रीधर सत्याग्रहात गेला?’

‘हो. विसापूर जेलमध्ये आहे.’

‘मी त्याला भेटायला जाईन आणि तो तुरुंगात असेपर्यंत मी बाहेर कशाला राहू? फिरून करीन सत्याग्रह!’ पतीसाठी काही सामान, पुस्तके, कपडे, वगैरे घेऊन प्रेमा विसापूरला आली. श्रीधरला भेटीची बातमी ऐकून आश्चर्य वाटले. तेथे ऑफिसमध्ये श्रीधर आला. प्रेमा बसलेली होती. दोघांचे डोळे भरून आले होते.

‘प्रेमा, मला क्षमा कर.’

‘श्रीधर, आपण सारे विसरून जाऊ. आपण आनंदाने राहू. तुरुंगाने आपणा दोघांस नवीन दृष्टी दिली. आपले घरचे स्वराज्य तरी सुखाचे होईल. इंग्रजांचा हृदयपालट होईल तेव्हा होईल. तुझा व माझा झाला. मी पुन्हा तुरुंगात जाईन. तू तुरुंगात असता मी आता बाहेर राहणार नाही. हे घे सामान. हे कपडे तू सुटशील तेव्हा घालण्यासाठी. हा चरखा घे. माझ्यासाठी सूत काढ. हा साबण. ही पुस्तके.’

‘प्रेमा, सरोजा कोठे आहे?’

‘भेटेल. तीही भेटेल. कोठेतरी आहे खास. एकदा दृष्टीस पडली होती, काळजी नको करू. जुने दु:ख उगाळू नको. नवीन भविष्याचे चिंतन कर. आशादायक, आनंददायक भविष्य हो.’

‘तूसुद्धा आनंदी राहा. मला क्षमा कर.’

‘श्रीधर, नको असे बोलू.’

‘परंतु म्हण ना क्षमा असे.’

‘क्षमा हो.’

श्रीधरच्या तोंडावर व प्रेमाच्या तोंडावर किती प्रसन्न हास्य होते तेव्हा.

« PreviousChapter ListNext »