Bookstruck

हरिजन यात्रा 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

१९३३ साली वैयक्तिक सत्याग्रह सुरू झाला होता. प्रेमा त्यात पुन्हा सामील झाली आणि रामराव काय करीत होते? महात्माजींनी आपला प्रख्यात हरिजन-दौरा हिंदुस्थानभर सुरू केला होता. सनातनी मंडळींची गंजलेली हृदये उघडण्यासाठी महात्माजी हिंडत होते. दिव्य संदेश देत होते. बाहेरची दगडी मंदिरे कोण उघडणार? ते महान् कार्य महापुरुषाने उचलले.

रामरावांनाही स्फूर्ती आली. हरिजनांसाठीच त्यांना छळ सहन करावा लागला होता. महात्माजींनी आपल्या तपस्येने आता स्फूर्तिगंगा निर्माण केली होती. वातावरण अनुकूल होते. आपणही प्रचार करीत बाहेर पडावे असे रामरावांना वाटले. सरोजाला ते बरोबर घेणार होते. सरोजाचा आवाज गोड होता. सुंदर अभंग व पदे तिला त्यांनी शिकविली होती. हरिजन चळवळीवरही त्यांनी गाणी केली होती.

आपल्या मित्रांचा निरोप घेऊन रामराव खरेच बाहेर पडले. गावोगाव घुमू लागले. सरोजा दमली तर ते तिला खांद्यावर घेत. हिंदुस्थानातील गावे जवळ जवळ असतात. चार चार मैलांवर गाव आहेच.

रामरावांची वाणी प्रासादिक होती. ते रस्त्यात भजन करीत उभे राहात. सरोजा मधून गाणी म्हणे आणि रामराव तेथेच उभ्याने प्रवचन सुरू करीत.

एकदा एका गावात ते गेले होते. लहानसे गाव. त्या गावात त्या दिवशी कोणी तरी मेले होते. रामरावांनी त्यावर प्रवचन सुरू केले.

‘बंधूंनो, मृत्यू सर्वांना समानता शिकवतो. हा राव की रंक मृत्यू बघत नाही. हा श्रेष्ठ की कनिष्ठ मृत्यू बघत नाही. ही मरणे म्हणजे देवाकडचे संदेश असतात. मरणे ही सावध करण्यासाठी येतात. एक दिवस मरायचे आहे सर्वांना. म्हणून प्रेमाने नांदा. कोणाला तुच्छ मानू नका. सारी देवाची लेकरे.’

« PreviousChapter ListNext »