Bookstruck

संतांचा मानवधर्म 15

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

श्री तुकाराम महाराजांची फाल्गुन वद्य द्वितीयेस पुण्यतिथि असते. या वर्षी त्यांची त्रिशत् सांवत्सरिक पुण्यतिथि आहे. सर्वत्र सोहळा होणार आहे. मुंबई सरकार तुकारामांच्या गाथेचे प्रकाशन करणार आहे. द्वितीयेस तुकारामांची पुण्यतिथि आणि षष्ठीस नाथांची पुण्यतिथि. चार दिवसांच्या अंतराने दोन थोर संतांच्या पुण्यतिथ्या प्रतिवर्षी आपण पाळीत असतो.

'ग्यानबा तुकाराम' हा जयघोष शेकडो वर्षे आपण घुमवीत आलो व जोवर मराठी भाषा आहे, महाराष्ट्र आहे, तोवर हा घोष घुमत राहील. विनोबाजी म्हणायचे, ''ज्ञानेश्वर गुरुप्रमाणे वाटतात, एकनाथ वडिलांप्रमाणे तर तुकाराम आईप्रमाणे त्यांची गाथा म्हणजे महाराष्ट्राला अखंड बोधामृत पाजणारी कामधेनुच होय.''

संतांची जीवने म्हणजे मानवतेचा मोठा आधार. तुकारामाचे जीवन म्हणजे अखंड प्रयत्‍नवाद. रात्रंदिवस धडपड करून त्यांनी आपले जीवन प्रभुमय केले. गाथेतील अभंग निरनिराळया मनोवृत्तीचे दर्शक आहेत. तुकारामांना एकच वेड होते, एकच ध्यास होता.

''ऐसे भाग्य कै लाहता होईन
अवघे देखे जन ब्रह्मरूप''


ही त्यांची असोशी होती. सारे भेद गळावेत, सर्वत्र मंगलाची अनुभूती यावी हा त्यांचा अट्टाहास होता. परंतु हे सारे कसे साधायचे? काम क्रोध पदोपदी आड येतात. तो अनंत परमात्मा दूरच राहतो. मीपण मेल्याशिवाय सर्वांबद्दल प्रेम कसे वाटणार? भोगवासना मरायला हवी, स्वार्थ गळायला हवा. जीवनांत संयम यायला हवा. विषयी माणसाजवळ कोठून मोक्ष? जोपर्यंत जीवनात सदगुणविकास नाही तोवर विनाशच आहे.

'अवगुणां हाती आहे अवघीची फजिती' असे ते म्हणतात. ही गुणसंपदा जीवनात यावी म्हणून तुकाराम रात्रंदिवस रडले, धडपडले.

इंद्रयांची दीनें
आम्ही केलों नारायणें


आम्ही इंद्रयांचे, वासनांचे गुलाम. परम पुरुषार्थ कोठून प्राप्त होणार?

धीर माझ्या मना
नाही आता नारायणा


असे ते करूण स्वराने म्हणतात. जीवन अजून शुध्द होत नाही म्हणून त्यांची कासाविसी होत असे. जीवनाचे सार काय? कशासाठी हे जीवन?

जन्मा आलियाचे फळ
अंगी लागो नेदी मेळ
जीवनाला इवलीही घाण लागू न देणे हीच कृतार्थता.
सर्वांगे निर्मळ
चित्त जैसे गंगाजळ

जीवन गंगाजळाप्रमाणे अन्तर्बाह्य निर्मळ व्हावे म्हणून त्यांची साधना होती. ते आशेने धडपडत होते. जर प्रयत्‍न खरा असेल तर काय कठीण?

''ओलें मूळ भेदी खडकाचे अंग
उद्योगासि सांग कार्यसिध्दी''

« PreviousChapter ListNext »