Bookstruck

संतांचा मानवधर्म 16

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

असे ते म्हणतात.

''याचसाठी केला होता अट्टाहास
शेवटचा दीस गोंड व्हावा''


शेवटचा क्षण तरी गोड होऊ दे. मरण समोर आले असता केवळ नित्संग वृत्ति असू दे. आतडे कुठे गुंतलेले नाही. सर्वांबद्दल प्रेम, सर्वांबद्दल समभाव. आणि जन्ममराणातून सुटावे असे नाही त्यांना वाटत. पुनः पुन्हा जन्माला घाल असे ते देवाला सांगतात. भगवान बुध्द म्हणाले, ''एखादाही प्राणी दुःखी असेल तोवर मी पुनः पुन्हा जन्म घेईन.'' ज्याला भूतमात्र जोवर भगवंताचे रूप वाटते तो जगाला कंटाळेल कशाला?

त्याचे हात सेवेत सदैव आनंद मानतील.

तुकारामांना खरी आत्मस्थिती हवी होती, शब्दज्ञानाचा त्यांना कंटाळा

'घरोघर अवघे आले ब्रह्मज्ञान
द्या रे एक कण जरी नीरें'


असे ते म्हणतात. भारतात ब्रह्मज्ञान अवघ्यांच्या तोंडी आहे, परंतु जीवनात मात्र त्याचा दुष्काळ. विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे, 'हिंदुधर्मातल्याप्रमाणे उदात्त तत्वे अन्यत्र नाहीत, त्याचप्रमाणे त्या तत्वांशी विसंगत असे आचरण करणारेही अन्यत्र नाहीत.'' या शाब्दिक ज्ञानाने काय होणार?

बोलाचीच कढी बोलाचाचि भात ।
जेऊनिया तृप्त कोण झाला ॥


असे तुकाराम विचारतात.

हित व्हावे तरी दंभ दूर ठेवा

अशी त्याची सांगी आहे. आपण श्रेष्ठ समजल्या जाणार्‍या  वर्णात जन्मलो नाही हे बरे झाले, नाही तर दंभ अंगी जडला असात असे म्हणतात.

बरे झाले कुणबी केलो
नाही तर दंभे असतों मेलो

« PreviousChapter ListNext »