Bookstruck

भारतीय संस्कृती 72

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

चार पुरुषार्थ

धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. या संसारात प्रयत्न करून मिळण्यासारख्या या चार वस्तू आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने प्राप्त करून घेण्यासारख्या गोष्टी, मनुषाने संपादण्यासारख्या वस्तू, पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ मराठीत आता कृतार्थता, पराक्रम, सार्थकता, प्रौढी अशांसारखा झाला आहे. “असे करण्य़ात काही पुरुषार्थ नाही.” असे आपण म्हणतो. याचा अर्थ असे करणे माणसास शोभत नाही. साजत नाही, यात कौतुक करण्यासारखे काही नाही, पराक्रम काही नाही असा होतो.

भारतीय संस्कृती सांगते, की संसारात चार वस्तू मिळवा. चार वस्तू-सोडा. भारतीय संस्कृती एकाच वस्तूवर जोर देत नाही. ती व्यापक आहे, एकांगी नाही. भारतीय संस्कृती दैन्य-नैराश्यांची गाणी गाणारी नाही. भारतीय संस्कृती पैशाला वमनवत् समजत नाही. अर्थ ही एक पुरुषार्थाची वस्तू आहे. द्रव्य, संपत्ती त्याज्य नाही. प्रयत्नाने द्रव्य जोडा, संपत्ती मिळवा. संपत्तीचे भारतीय संस्कृतीस वावडे नाही. संपत्तीला पचविणारी भारतीय संस्कृती आहे. संपत्तीप्रमाणेच कामोपभोग. भारतीय संस्कृती कामाला सन्मान्य स्थान देत आहे. काम ही एक पुरुषार्थाची वस्तू मानली गेली आहे. संपत्ती पवित्र आहे. कामही पवित्र आहे. अर्थ आणि काम माणसाने मिळवावेत. संपत्ती मिळवावी आणि तिचा नीट उपभोगही घ्यावा. काम म्हणजे केवळ रतिसुख एवढाच अर्थ नाही. काम म्हणजे उपभोग, सुखोपभोग. काम म्हणजे विषयसुख, पंचेन्द्रियांचे सुख, पंचविषयांचे सेवन. अशा व्यापक अर्थी काम हा शब्द घेतला पाहिजे.

तुकारामांच्या एका अभंगात एक फार थोर वचन येऊन गेले आहेः

विधीनें सेवन। धर्माचे पालन।।

विषयांचे विधियुक्त सेवन कराल, तर ते धर्महीन नाही. मर्यादित प्रमाणात विषयभोग घेणे यात धर्माची च्युती नाही. धर्म म्हणजेच विधियुक्त ग्रहण. तुकारामांच्या दुसराही एक चरण आहेः

जोडुनियां धन उत्तम व्यवहारें। उदार विचारें वेच करी।।

धन मिळवू नका असे हो थोर संत सांगत नाही, परंतु धन उत्तम व्यवहाराने जोडा आणि ते जोडलेले धन विवेकाने व उदारपणाने खर्च करा, असे तो सांगत आहे.

विधी म्हणजे आज्ञा. स्मृतीतून विधी शब्द नेहमी येत असतो. कोणतेही कर्म विधिपुरःसर करा असे स्मृती सांगत असते. म्हणजे शास्त्रवचन. विधी म्हणजे स्मृतीतील विधान. विधी म्हणजे धर्म. जे कर्म विधियुक्त नाही ते अधार्मिक होय, असे स्मृतिकार सांगतात. परंतु विधी कसला ? कशाविषयी विधी ? कशाविषयी आज्ञा ? कशाविषयी बंधन ? कशाविषयी मर्यादा ?

भारतीय संस्कृती मानवी मन ओळखते. मनुष्याच्या हृदयाच्या भुका ती ओळखते. मनुष्याला वासना-विकार आहेत, ही गोष्ट भारतीय संस्कृती डोळ्यांआड करीत नाही. भारतीय संस्कृतीचे ध्येय परमोच्च असले, तरी ती मर्यादा ओळखते. मानवी आत्मा या मातीच्या शरीरात अडकलेल्या आहे, हे आत्महंस या चिखलात रुतलेला आहे, त्याला हळूहळू या चिखलातून बाहेर काढले पाहिजे ही गोष्ट भारतीय संस्कृती कधी विसरत नाही.

« PreviousChapter ListNext »