Bookstruck

भारतीय संस्कृती 73

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सारी मानवी संस्कृती चिखलातूनच वर आली आहे. चिखलात किडेही होतात ; परंतु चिखलातून पंकजही फुलते. चिखलातून कमळे पुरविणे हे भारतीय संस्कृतीचे ध्येय आहे, अंधारातून प्रकाश निर्माण करणे, मातीतून हिरे व माणके निर्माण करणे, मरणातून अमरता मिळविणे, हे भारतीय संस्कृतीचे ध्येय आहे.

रवीन्द्रनाथांची एक सुंदर कविता आहे. त्या कवितेत रवीन्द्रनाथ म्हणतात, “फुलापासून दिलेल्या गंधाची, दिलेल्या रंगाची देव मागणी करतो. कोकिळापासून दिलेल्या कुहूकुहूची फक्त तो अपेक्षा करतो. वृक्षापासून विवक्षित फळाचीच तो आशा राखतो. परंतु मानवाच्या बाबतीत देवाचा नियम निराळा आहे. त्याने मनुष्याला दुःख दिले आहे व त्यातून माणसाने सुख मिळवावे अशी त्याची अपेक्षा आहे. त्याने माणसाला अंधार दिला आहे ; ‘या अंधारातून प्रकाश प्रकट करा’ असे तो सांगतो. त्याने माणसास मर्त्य केले आहे; ‘या मरणातून अमृतत्व मिळवा’ असे तो म्हणतो. त्याने आजूबाजूस घाण ठेविली आहे, असत् ठेविले आहे ; ‘असतातून सत् मिळवा, या विषातून सुधा सृजा, या अमंगलातून मंगलता निर्माण करा’ असे तो म्हणतो. देवाचा मानवाच्या बाबतीतच असा पक्षपात का बरे ? मानवावरच ही महान जबाबदारी का ? मानवाच्या बाबतीत का ही कठोरता, का ही अशक्य अपेक्षा ? नाही, देव कठोर नाही. दुष्ट नाही. सर्व सृष्टीत मानवप्राणी थोर असे देवाला वाटते. मानवापासून या गोष्टी त्याने नाही अपेक्षावयाच्या तर कोणापासून ? यात मानवाचा गौरव आहे. एखाद्या वीराला लहानसा किडा मारावयास सांगणे हा जसा त्याचा अपमान आहे, तद्वत मानवापासून क्षुद्र वस्तूंची अपेक्षा राखणे म्हणजे त्याच्या शक्तीचा अपमान आहे. माझा लाडका मनुष्यप्राणी हे सर्व करू शकेल अशी देवाला आशा आहे. चौ-यांयशी लक्ष योनीनंतर जन्माला आलेला हा थोर मानवप्राणी, हा सर्व सृष्टीचा मुकुटमणी, माझी आशा फोल करणार नाही अशी देवाला श्रद्धा आहे.”

किती सुंदर आहे ही कविता, किती थोर आहे हा विचार, किती विशाल व गंभीर आहे ही सृष्टी ! शेक्सपीअरने एके ठिकाणी मानवाचा मोठेपणा असाच वर्णिला आहेः ‘कसा सुरेख चालतो, कसा सुंदर दिसतो, कसे थोर हृदय, कशी विचार करण्याची शक्ती, कशी विशाल दृष्टी ! मनुष्य म्हणजे भगवंताची मूर्तीच होय.’ अशा अर्थाने ते वर्णन आहे.

धन्य धन्य हा नरदेहो। येथील अपूर्वता पहा हो।।

असे समर्थांनी थोर उद्गार काढले आहेत.

बहुता पुण्यपुण्येन क्रीतेयं कायनौस्त्वया।।

‘अरे, हा मानव-देह मोठ्या भाग्याने तुला मिळाला.’ असे हे वचन सांगत आहे. तुकारामांनी तर नरदेहाला ‘सोनियाचा कलश’ असे म्हटले आहे. या नरदेहात जन्मून नराचा नारायण होणे हे महत्त्वाचे ध्येय, असे भारतीय संत सांगत आहेत.

« PreviousChapter ListNext »