Bookstruck

भारतीय संस्कृती 155

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आकाशातील सूर्य ही देवाचीच मूर्ती. ज्याच्याजवळ अंधार नाही, जो रात्रंदिवस जळत आहे, जगाला जीवन देत आहे, अशा ह्या धगधगीत तेजोगोलाच्या ठायी परमेश्वरी अंश नको मानू तर कोठे मानू ?

गंगेसारख्या हजारो एक जमीन सुपीक करणा-या नद्या, हिमालयासारखे गगनचुंबी बर्फाच्छादित पर्वत, आकाशाला भिडू पाहणारे प्रचंड वटवृक्ष, उदार, धीरगंभीर वनराज केसरी, भव्यदिव्य पिसारा उभारणारा तो सौन्दर्यमूर्ती मयूर, अशांच्या ठायी देवाचे वैभव नको मानू, तर कोठे मानू ?

विश्वामित्राने एकशेएक मुलगे डोळ्यांदेखत ठार केले, तरीही शांती न सोडणारे भगवान वसिष्ठ, सत्यासाठी राजपद त्यागून वनात जाणारे प्रभू रामचंद्र, अंगाचे मांस करवतून देणारे मयूरध्वज, बालवयात रानात जाणारा तेजस्वी ध्रुव, महाभारत रचणारे श्रीमत् व्यास, या सर्व ईश्वराच्याच विभूती होत.

मुलाचे लालनपालन करणारी, मुलाला जरा दुखले-खुपले तर कावरीबावरी होणारी, स्वत:च्या प्राणांचे पांघरूण घालून बाळाचे प्राण वाचवू पाहणारी, कुठे काहीही गोड मिळो, आधी बाळाला आणून देणारी, बाळाला आधी गोड घास, बाळाला नीट कपडे, बाळाला आधी सारे, असे पुत्रमय जणू जिचे जीवन झाले. आहे अशी प्रेमसागर माता, तिला देव नाही म्हणायचे तर कोणाला ?

मातृदेवो भव
अशी श्रुतीची आज्ञा आहे. देवाची पूजा तुला करावयाची आहे का ? तुझ्या मातेची पूजा कर, म्हणजे ती देवालाच मिळेल. ईश्वराच्या अपार प्रेमाची कल्पना मातेच्या प्रेमावरूनच आपणांस येऊ शकेल.

आणि पशूचा माणूस करणारा तो थोर सदगुरू-तीही ईश्वराचीच मूर्ती. आईबापांनी देहच दिला; परंतु गुरूने ज्ञानचक्षू दिले. मानवी जन्माचे सार्थक करावयाचे त्याने शिकविले. तो गुरू म्हणजे माझा देव.

या सा-या ईश्वराच्याच मूर्ती. जगात या थोरांची मंदिरे आहेत, जिकडे तिकडे पुतळे आहेत, तसबिरी आहेत, स्मारके आहेत. युरोप खंडात जाल तर सर्वत्र विभूतिपूजा दिसेल. ईश्वराची अनंत स्वरूपांत तेथे पूजा आहे. संतांमधील दिव्यत्व भारतीय संस्कृती ओळखते. परंतु युरोपीय संस्कृती कवी, तत्त्ववेत्ते, गणिती, विज्ञानवेत्ते, वीर मुत्सद्दी, संगीततज्ज्ञ, चित्रकार, शिल्पकार, अभिनयविशारद,- सर्व प्रकारच्या परमेश्वराच्या विभूतिमत्त्वाचे पूजन करीत असते.

भारतीय मूर्तिपूजा शेवटी काय संदेश सांगते ? भगव्दगीतेतील दहावा अध्याय मूर्तिपूजा शिकवीत आहे. जगात जेथे जेथे विभूतिमत्त्व दिसेल, तेथे तेथे माझा अंश तू मान, असे गीता सांगत आहे. परंतु एवढ्यावरच गीता थांबत नाही. गीता सांगते :
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥

या चराचरात सर्वत्रच मी भरून राहिलो आहे. महान विभूतींत मला प्रथम पाहावयास शीक. परंतु तेवढ्याने भागणार नाही. ज्याप्रमाणे लहान मुलाला शिकविताना प्रथम सोपी अक्षरे देतात, ती अक्षरे मोठ्या आकारात काढतात, परंतु एवढयाने मुलाचा वाङमयात प्रवेश होणार नाही. मुलाला समजले पाहिजे की, मोठे अक्षर तेच बारीक अक्षर. पाटीवरचा मोठा ग व पुस्तकातील रोडका ग दोन्ही एकरूपच. साधी अक्षरे शिकून झाल्यावर लहान-मोठी अक्षरे एकच. हेही समजल्यावर, लहान मुलाने जोडाक्षरेही समजून घेतली पाहिजेत. जोडाक्षरे त्याला न समजतील तर तो पदोपदी अडेल, रडेल.

« PreviousChapter ListNext »