Bookstruck

भारतीय संस्कृती 156

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आई हे सोपे सुटसुटीत अक्षर आहे. आई म्हणजे देव हे समजलो. रामकृष्ण म्हणजे देव हे समजलो. सागर व वटवृक्ष हे देव समजलो. परंतु रावण ? कंस ? चावायला येणारा विषारी भुजंग ? भयंकर व्याघ्र ? ही कोणाची रूपे ?

हीही देवाचीच रूपे ! परंतु ही जोडाक्षरे आहेत. ही समजायला जरा कठीण आहेत. परंतु ही समजून घेतलीच पाहिजेत. नाही तर जीवनात आनंद नाही, मोक्ष नाही, पाव्हरीबाबांना सर्प चावला; ते म्हणाले, 'देव चुंबन देऊन गेला !'

शेवटी सर्वत्र देवाचे दर्शन घ्यावयास शिकावयाचे आहे. मूर्तिपूजेचे हे पर्यवतास आहे. जेथे तेथे मग त्याच्याच मूर्ती, त्याचीच अनंत राउळे. प्रत्येक वस्तू; प्रत्येक व्यक्ती म्हणजे त्या चिदंबराचे-दिगंबराचे मंगल मंदिरच होय ! ख-या भक्ताला प्रत्येक पदार्थातून चिन्मयाचेच दर्शन होते. तो सर्व सृष्टीकडे भक्तिप्रेमाने पाहात राहतो व त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येतात !

मूर्तिपूजा करता करता विश्व हीच मूर्ती वाटू लागली पाहिजे. परंतु सर्व चराचर सृष्टी मंगल व पवित्र वाटणे तर दूर राहिले, निदान मानवप्राणी तरी पवित्र व थोर वाटू दे. मूर्तिपूजेचा पहिला धडा तरी आपण शिकला पाहिजे. परंतु हा धडा अद्याप मानवप्राणी शिकला नाही.

आपणांस धर्म यांत्रिक रीतीचा आवडतो. परंतु धर्म म्हणजे संस्कार. प्रत्येक कृतीचा जीवनावर ठसा उमटला पाहिजे. आपण नेहमी मूर्तिपूजा करतो, परंतु त्याचा कोणता ठसा उमटतो ? आपण पूजा करताना कधी मनात म्हणतो का; 'देवा ! आजच्यापेक्षा उद्या हे माझे हात अधिक पवित्र होतील, आजच्यापेक्षा उद्या हे डोळे अधिक प्रेमळ व प्रामाणिक होतील, आजच्यापेक्षा उद्या हृदय विशुध्दतर व विशालतर होईल. आजच्यापेक्षा बुध्दी उद्या अधिक स्वच्छ व सतेज होईल ?'

आपल्या मनात काहीही नसते. चोवीस वर्षांपूर्वी हे हात जितके अपवित्र होते तितकेच, किंबहुना अधिकच अपवित्र, चोवीस वर्षांच्या पूजेनेही आज आहेत ! विकास नाही; वाढ नाही, पावित्र्य नाही, प्रेम नाही, भेद गळला नाही, अहंकार झडला नाही. अशी यांत्रिक पूजा काय कामाची ?

मूर्तिपूजेत कृतज्ञतेची सुंदर कल्पना आहे. कृतज्ञतेसारखी सुंदर वस्तू जगात कोणतीही नाही. परमेश्वराने आपणांस सर्व काही दिले आहे. त्याचे उतराई आपण कसे होणार, हा भाव प्रत्येकाच्या हृदयात असतो. ज्या ईश्वराने या विश्वमंदिरात रवी-शशी-तारे पेटवून ठेविले आहेत, त्याला आपण नीरांजनाने ओवाळतो, काडवातींनी ओवाळतो. ज्याने अनंत प्रकारच्या परिमलांची कोट्यवधि फुले पृथ्वीवर फुलविली आहेत, त्याला उदबत्तीचा वास आपण देतो. ज्याने रसाळ फुले दिली, नानाविध धान्ये दिली, कंदमुळे दिली, दूधदुभते दिले, त्या देवाला वाटीभर दुधाचा नैवेद्य दाखवितो; ज्याने सागर उचंबळत ठेविले आहेत, जो मेघमाला पाठवीत आहे, नद्यानाले वाढवीत आहे, वापी-तडाग भरवीत आहे, त्याच्यावर तांब्याभर पाण्याचा आपण अभिषेक करतो. ही का देवाची थट्टा आहे ?

'लोकहितवादी'नी आपल्या एका पत्रात एके ठिकाणी लिहिले आहे की, हा सारा बावळटपणा आहे. परंतु हा बावळटपणा नाही. ही कृतज्ञतेची खूण आहे. त्या विराट विश्वंभराला मी माझ्या चिमुकल्या हातांनी कसा पकडणार ? कोणत्या देवघरात त्याला बसविणार ? त्या विश्वंभराची माझ्या मनाच्या सुखार्थ मी एक लहानशी मूर्ती करीन, मला आवडेल ते रूप देईन; आणि त्या मूर्तीला मी पूजीन. तिला गंध लावीन, फुले वाहीन; धूप; दीप; नैवेद्य दाखवीन. त्या मूर्तीला प्रदक्षिणा घालीन, त्या मूर्तीला लोटांगण घालीन. माझी कृतज्ञता मी प्रकट करीन. सर्वत्र असणा-या प्रभूला ती पूजा पोचेल.

बापाच्या ताटातले घेऊन बाळ बापाला भरवू पाहतो. बापाला अपमान वाटत नाही. तो प्रेमाने तोंड पुढे करतो. तद्वत् तो चराचर पिता भक्तावर रागावणार नाही. देवाचेच घेऊन देवाला द्यावयाचे. गंगेतील पाण्याने गंगेलाच अर्ध्य द्यावयाचे. कोठूनही कृतज्ञता प्रकट करण्याचे साधन मिळाले म्हणजे झाले.

« PreviousChapter ListNext »