Bookstruck

यज्ञ 20

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“अरे, खाऊन खाऊनच तो विटला. किती खाणार ?”

दधीची सारे शांतपणे ऐकत होता. तो कोणाच्या अंगावर धावून गेला नाही. पूर्वीचा दधीची राहिला नाही. पूर्वीचा दधीची असे कधीच ऐकून घेत ना. तो कोणाच्या थोबाडीत मारता, कोणाच्या छातीवर बसता, कोणाला बकुलता, बुक्क्या देता. सारा आश्रम तो गजबजवून सोडायचा; परंतु आज सिंह शांत झाला होता. दधीची शांत पारवा बनला होता. आज ना धडपड, ना फडफड. दधीची चिडत नाही असे पाहून मुलेही गंभीर होऊन निघून गेली.

दधीची आज आश्रमातून घरी जाणार होता. गुरुगृही सोडून गृहस्थाश्रमात पदार्पण करण्यासाठी जाणार होता. सर्वांना वाईट वाटत होते. तो सर्वांचा निरोप घेत होता. आश्रमातील चैतन्य जणू जात होते. आश्रमातील खेळकरपणा, उत्साह, शक्ती जणू आज जात होती. दधीची गुरुदेवांच्या पाया पडला. त्यांनी त्याला हृदयाशी धरिले व सांगितले, “जा ! नीट रहा ! प्रपंचच परमार्थमय कर. सूर्य जाईल तेथे प्रकाश नेईल. गंगा जाईल तेथे ओलावा देईल. तू ज्ञानाचा प्रकाश, प्रेमाचा ओलावा सर्वत्र घेऊन जा. संसारात तोही आनंद पिकव. स्वतः आनंदी हो, आसमंतात असलेला समाज तोही आनंदी कर. संयम सोडू नकोस. वासनांवर विजय मिळव. भावना निर्मळ ठेव. बुद्धी विशाल ठेव. दृष्टी निर्मल ठेव. जा. माझा तुला आशीर्वाद आहे.”

दधीचीने गृहस्थाश्रम स्वीकारला. तो आईबापांची सेवा करी, स्वतः कृषी करी. त्याने सुंदर फळझाडे लावली, फुलझाडे लावली. शेतात खपावे, मळ्याला पाणी द्यावे, रात्री ता-यांचे चिंतन करावे, असा चालला वेळ. तो रानातील रसाळ फळे आणी व आई-बापांस देई. सुंदर फुले आणी व त्यांना देई. त्यांची वस्त्रे तो धुई, त्यांचे पाय तो चेपी परंतु वृद्ध मातापितरे किती दिवस राहणार ? दधीचीला आशीर्वाद देत ती देवाघरी गेली.

दधीची मुलांजवळ प्रेमाने वागे. त्यांच्याजवळ खेळे, हसे. पत्नीबरोबर कधीही त्याचे भांडण झाले नाही. त्याच्या मुखावरची प्रसन्नता काही अपूर्व होती. त्याचे मुखमंडल पाहताच   दुस-यांच्या कपाळावरील आठ्या मावळत व तेथेही प्रसन्नता फुले. प्रसन्नतेचा स्पर्श व्यापक आहे.

दधीची शेतात खपे. वाईट गवत खणून काढी. ते काम करता करता त्याच्या मनात येई, ‘ही पृथ्वी निर्मळ व्हावी म्हणून मी खपत आहे. येथे पुष्टी देणारे धान्य वाढावे म्हणून हे विषारी गवत, निरुपयोगी गवत मी खणून फेकीत आहे. माझ्या हृदयाची भूमी केली आहे का निर्मळ ? तेथील वासनांचे सारे गवत टाकले आहे का उपटून ?’ असे विचार मनात येऊन तो तसाच तेथे बसे.

हळूहळू हे विचार अधिकच येऊ लागले. त्याला काही सुचेना, रुचेना. त्याला गुरुदेवांचे शब्द आठवलेः ‘मनोजयाचे बळ आणि शेवटी चराचराशी एकरुप होण्याचे बळ. उत्तरोत्तर पुढे जा.’ तो अस्वस्थ झाला. दधीची दुःखी झाला. पत्नीने दुःकी चेहरा कधी पाहिला नव्हता. ती एके दिवशी पतीला म्हणाली,

« PreviousChapter ListNext »