Bookstruck

यज्ञ 21

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“तुम्हाला काय होते ? अशी का अलीकडे मुद्रा ? प्रसन्नता कोठे गेली ? हास्य कोठे गेले? आनंद का अस्तास गेला ? मला नाही का सांगणार ? मी का निराळी आहे ?”

“तू निराळी नाहीस. मी तुझ्याशी, या आपल्या मुलाबाळांशी, या आपल्या संसाराशी एकरुप आहे. परंतु मला वाढू दे. सा-य़ा त्रिभुवनाशी मला एकरुप होऊ दे. सा-या विश्वाशी माझा आत्मा नेऊन भेटवू दे. तू देशील मला अनुज्ञा ? जाऊ का मी वनात ? तपश्चर्य़ा करीन, विश्वाशी एकरुप होईन. जाऊ ?”

“तुम्हाला तोच ध्यास लागला असेल तर जा. मी तुम्हाला अडवीत नाही. मी मुलाबाळांना वाढवीन. या कळ्या फुलवीन. तुम्ही खरेच जा. चिंता नका करू. तुमचा आनंद तो आमचा. तुमच्या मोक्षाने आम्ही मुक्त होऊ. एक सूर्य सर्व जगाला प्रकाश देतो. जगाला प्रकाश देण्यासाठी जा. सूर्य व्हा. माझा पतिदेव वाढो, वरती जावो, कृतकृत्य होवो, अशी मी प्रार्थना करीन.”

“कर प्रार्थना. प्रार्थना म्हणजे बळ. प्रार्थनेने अप्राप्य प्राप्त होते, अशक्य शक्य होते. तुझ्या पतीसाठी प्रार्थना कर. ती प्रार्थना मला प्रेरणा देईल, पुढे नेईल.”

दधीचीने मुलांच्या अंगावरून हात फिरवला. त्यांच्या मुखकमलांचे अवघ्राण केले. निजली होती ती. पिता जागा व्हायला जात होता. पत्नी अंगणापर्यंत आली.

“जातो. मुलांना जप.”

“जा, विजयी व्हा, कृतकृत्य व्हा.”

“जा आता मागे.”

“तुम्ही जा आता पुढे.”

“जाऊ, का राहू ?”

“जा, मागे पाहू नका. तुमच्या जीवनाचा पतंग उंच जाऊ दे. आम्ही ती शोभा पाहू व पवित्र होऊ.”

“किती तुझा धीर ! खरी आदर्श पत्नी.”

“तुमची आकांक्षा ती माझी. तुमचा विजय तो माझा. तुमचे भाग्य ते माझे. कोठेही गेलेत तरी माझेच आहात. माझ्या हृदयात राहून मग चराचरांचे व्हाल. खरे ना ? तो पाहा ध्रुव. निश्चल तेजस्वी तारा.”

“मलाही होऊ दे स्थिर, करू दे निश्चय. ध्रुव दाखवलास, ध्रुवाप्रमाणे अविचल होऊ दे मला. जातो.”

« PreviousChapter ListNext »