Bookstruck

आपण सारे भाऊ 14

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आता घरात रघुनाथचे राज्य होते. आणि रमाबाई राणीसाहेबांची सत्ता होती. त्यांच्या आनंदाला, सुखपभोगाला सीमा नव्हती. घरातील कामकाज करायला पूर्वी गडीमाणसे होती. परंतु आता स्वयंपाकालाही बाई  ठेवण्यात आली. रमाबाईंना एकच काम असे. ते म्हणजे आज्ञा करण्याचे!

परंतु कृष्णनाथची काय स्थिती? तो सुखी होता का? आईबापांची त्याला आठवणही होणार नाही, अशा रीतीने त्याला वागविण्यात येत होते का? त्या वासराला प्रेमाचा पान्हा मिळत होता का? त्याच्या पाठीवरुन कोणी हात फिरवीत होते का? त्याला प्रेमाने कोण जवळ घेत होते का? त्याचे दुखले खुपले कोणी विचारीत होते का? त्याला काय हवे नको, कोणी दाद घेत होते का? त्याला चांगले कपडे होते का? अंथरायला पांघरायला होते का? पायात काही होते का? त्याला सकाळी दूध मिळत होते का? शाळेतून येताच त्याला खायला मिळत होते का? खेळायला खेळ होते का? खाऊ मिळत होता का? कृष्णनाथ, बाळ, काय तुझी हकीकत-काय आहे कहाणी?

कृष्णनाथ अनाथ झाला होता. प्रथम काही दिवस जरा बरे गेले. दादा जरा जवळ घेत असे, डोक्यावरुन हात फिरवीत असे. त्याला खाऊ आणून देत असे. परंतु तेरडयाचे रंग तीन दिवस. वळवाचा पाऊस क्षरभर. कायमचा प्रेमाचा रंग तेथे कसा दिसणार? कायमचा ओलावा तेथे कसा आढळणार?

कृष्णनाथ मराठी चौथीत होता. एकदा त्याच्या वर्गातील मुले वनभोजनास जाणार होती. बरोबर त्यांचे शिक्षक येणार होते. बाहेर कोठे जायचे म्हणजे मुलांना आनंद होत असतो. घरांतुन कोण बाहेरगावी जायला निघाले, तर मुले त्यांच्या पाठीस लागल्याशिवाय राहात नाहीत, मग त्यांची समजूत घालावी लागते. खाऊ द्यावा लागतो. नाही तर मार देऊन गप्प बसवावे लागते.
‘दादा, उद्या मी जाऊ का वनभोजनाला? सारी मुले जाणार आहेत. जाऊ का? नंदगावला जाणार आहेत. तेथे लहानसा धबधबा आहे. मजा. जाऊ का, दादा? सांग ना.’

‘तू लहान आहेस. नको जाऊस.’

‘माझ्याहूनसुध्दा लहान असणारी मुले जाणार आहेत. आपली गाडी नको. मी पायी जाईन. सारी मुले पायीच जाणार आहेत.’

‘तू का तीन चार मैल पायी जाणार?’

‘हो, जाईन.’

‘जा. जपून वाग. तेथे नदी आहे. फार खोल पाण्यात जाऊ नकोस. समजले ना?’

‘परंतु दादा, बरोबर फराळाचे हवे, वैनी देईल का?’

‘जा, तिला विचार.’
कृष्णनाथ खाली वैनीला विचारायला गेला. इकडे रघुनाथ कोट-टोपी घालून फिरायला गेला. वैनी बागेत होती. निशिगंधाची फुले तोडीत होती.

« PreviousChapter ListNext »