Bookstruck

दुर्दैवी 44

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तो गडी आला. ना धड अंगावर कपडे, ना काही. तोंड धुतलेले नाही. डोळे चोळीत आला. तो तेथे हेमंत उभा होता. इतर गाडीवान तयार होते.

''रामा, तू उशीर केलास? आणि असा काय आलास? अंगात कुडते तरी घालून ये. तोंड धुऊन ये.'' हेमंत म्हणाला.

''असाच बसू दे त्याला गाडीवर. जाऊ दे उघडा. एरव्ही त्याला आठवण नाही राहायची.'' रंगराव गर्जले.

''मी त्याला असे जाऊ देणार नाही. म्हणतील, हेमंत अशी काय माणसे पाठवतो? त्या गावी माझी नाचक्की होईल.जा रामा, नीटनेटके होऊन ये. आपल्या दुकानाच्या लौकिकाला साजेसा होऊन ये, जा!''

''रामा, जायचे नाही. तू असाच जा. दुकान माझे आहे. माझ्या दुकानाचा लौकिक गेला तरी चालेल. पण माझ्या इच्छेप्रमाणे, आज्ञेप्रमाणे सारे झालेच पाहिजे. खबरदार घरी परत जाशील तर!'' रंगराव ओरडले.

''रामा, जा. मी सांगतो.'' हेमंत शांतपणे म्हणाला.

''हेमंत, येथे मी मालक आहे. या सर्वांच्या देखत तू का माझा अपमान करणार?''

''तुम्ही मालक आहात. मी तुमचा व्यवस्थापक आहे. मालक वेडेवाकडे करू लागला तरी व्यवस्थापकाने सारे पाहिले पाहिजे. तुमचा सर्वत्र मान राहावा म्हणूनच मी हे सारे करीत आहे.''

शेवटी रामा गेला. तो तोंड धुऊन कपडे घालून आला. गाडया गेल्या. रंगराव नि हेमंत दोघेच तेथे उभे होते.

''भाऊ, तुम्ही उगीच रागावता.'' हेमंत म्हणाला.

''हेमंत, सर्वत्र तुझे प्रस्थ माजत आहे. मी का कोणीच नाही? मला हे सहन होणार नाही.''

''भाऊ, आपण का एकमेक परके आहोत?''

''मानभावी बोलणी मला समजतात!'' असे म्हणून रंगराव निघून गेला.

« PreviousChapter ListNext »