Bookstruck

दुर्दैवी 43

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रंगराव ते बोलणे ऐकून गारच झाले. ते रागावले. हेमंत शांत होता. परंतु तो वेळप्रसंग ओळखून म्हणाला,

'रंगराव अनेक संकटांतून गेले आहेत. त्यांचे जीवन तुम्हांला काय माहिती? म्हणून ते कधी संतापतात, रागवतात. ज्याने जीवनात पदोपदी निराशा अनुभवलेल्या असतात, तो मनुष्य जरा संतापी बनतो. परंतु रंगराव खरे म्हटले तर प्रेमळ आहेत.'

''माझी स्तुती करायला तू नकोस. तुझे प्रशस्तिपत्र मला नको आहे. मला कोठे नोकरी नाही मिळवायची, समजलास? एकंदरीत तू चांगला, मी वाईट. या सर्वांचा तू आवडता, होय ना? खेडयापाडयांतून तुला आमंत्रणे, तुला मान, तुझी स्तुती! आणि मी? वास्तविक, तू माझा नोकर. ठीक; तूच जा न्याय द्यायला. तूच लायक आहेस.'

असे म्हणून रंगराव तेथून निघून गेले. हेमंतला त्यांचे ते बोलणे चमत्कारिक वाटले. काही तरी घरी भानगड झाली असेल असा त्याने तर्क केला. ते शेतकरी गेले. तो आपल्या कामात दंग झाला. थोडया वेळाने तो धान्यबाजारात गेला. शेकडो गाडया आल्या होत्या. पाहतो तो तेथे आज रंगरावही आले होते.

''भाऊ, तुम्ही कशाला आलेत? मी नाही का सारे काम करायला?''

''तू उद्या गेलास, तर मलाच करावे लागेल. शेतकर्‍यांशी संबंध हवा.''

हेमंत काही बोलला नाही. रंगराव गाडीवानाजवळ जाऊन चौकशी करू लागला, परंतु ते शेतकरी हेमंतकडे येत. तुम्हीच सौदा ठरवा, भाव ठरवा, असे ते त्याला म्हणत. रंगराव रागावे, चिडे. शेवटी तो घरी निघून जाई. असे दिवस जात होते. रंगराव हेमंताकडे आता मत्सराने पाहू लागला. त्याचे प्रेम कोठे गेले? एके दिवशी तर दोघांचे चांगलेच भांडण झाले. त्या दिवशी भल्या पहाटे काही गडी गाडया घेऊन जाणार होते. सारे ठरले होते. परंतु एक गडी कोठे आहे? रंगराव खवळले. ते त्या गडयाच्या झोपडीत गेले. त्यांनी त्याला ओढले.

''पहाटे उठून गाडया जोडायचे ठरले होते की नाही? अजून तू उठला नाहीस. ऊठ, असाच चल. तोंड वगैरे नाही धुवायचे. असाच नीघ!'' रंगराव त्याला संतापाने म्हणाले.

« PreviousChapter ListNext »