Bookstruck

दुर्दैवी 47

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''मी की नाही, आता दोन दिवसांची सोबतीण आहे. तुम्ही प्रकृतीला जपा. हेमाचे सारे नीट करा.''

''हेमा अजून माझे नाव लावीत नाही याचे मला वाईट वाटते. आपण जयंताची मुलगी असेच तिला वाटते. 'हेमा जयन्त हारीत' असे ती नाव लावते. तिला आता सांगू का सारा खरा इतिहास? तू माझी मुलगी आहेस, असे सांगू का?''

''इतक्यात नको. तिला धक्का बसेल. हळूहळू योग्य वेळी सारे होईल. आणि मी एक पत्र लिहून ठेवले आहे. ते तुम्ही हेमाला तिच्या लग्नाच्या वेळेस द्या. लग्न झाले म्हणजे द्या किंवा सारे ठरले म्हणजे.''

''मी तिला सांगून टाकतो की तू माझी आहेस. हा दुजेपणा मला सहन होत नाही, माझी मुलगी असूनही तिने दूर राहणे, मी तिचा जन्मदाता पिता जवळ असूनही आपल्याला पिता नाही असे तिला वाटते, आणि उद्या तूही गेलीस तर तिला किती पोरके वाटेल, खरे ना? मी तिला सांगतो. सांगू का?''

''माझे डोळे मिटू देत. मग सांगा.''

''जशी तुझी इच्छा. दे ते पत्र.''

तिने कापर्‍या हातांनी त्याच्या हातात ते पत्र दिले. ते पत्र जवळ घेऊन तो गेला. त्याने ते पेटीत नीट ठेवले. तो पुन्हा तिच्याजवळ येऊन बसला.

''तुझी काही इच्छा आहे का?''

''माझी आठवण ठेवा. माझे सारे चुकले माकले क्षमा करा. तुमची माया भोळीभाबडी आहे. तिने जाणूनबुजून कोणाचे वाईट केले नाही. हेमाचे सारे नीट करा. चांगली आहे मुलगी.''

''तू काळजी नको करूस.''

''हेमाला हेमंत वर नाही का शोभणार?''

''ते मी पुढे पाहीन. आताच नको त्याची चर्चा.''


« PreviousChapter ListNext »