Bookstruck

दुर्दैवी 48

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''माझ्या मनात आले ते सांगितले. परंतु मी भोळी. तुम्हांला माणसांची पारख असणार. तुम्ही धान्याची पारख करता. गवताची पारख करता. माणसाची पारखही तुम्हांला असेल. हेमाला पुढे त्रास होणार नाही असे पाहा म्हणजे झाले.''

''तू बोलू नकोस. थकलीस बघ.''

''आता बोलणे लवकरच बंद होईल. तुम्ही या जाऊन बाहेर तुमचे बाजार बघून या. तुम्हांला माझ्याजवळ बसायला वेळ तरी कुठे असे? अठरावीस वर्षांनी मी तुमच्याकडे परत आले. परंतु मी का पूर्वीची आहे? केससुध्दा पार पिकले. तुम्हा पुरुषांना हजार धंदे. जाऊ दे. परंतु मी दु:खी नाही. मरताना मला समाधान आहे. तुम्ही सारी जपा, सुखी असा.''

रंगराव तेथे मुकाटयाने बसले होते. हेमाही आली. थोडया वेळाने डॉक्टरांना घेऊन हेमंतही तेथे आला. मायेने हेमंताकडे पाहिले.

''हेमंत, सारी जपा.'' एवढेच ती म्हणाली. डॉक्टरांना बघून ती म्हणाली, ''आता डॉक्टर नकोत.''

डॉक्टरानीही रंगरावाला तोच सल्ला दिला. ते निघून गेले. गडीमाणसे, मोलकरीण दारातून डोकावत होती. नमस्कार करून जात होती. माया सर्वांवर प्रेम करी. तिचे जीवन गरिबीत गेले होते. आज ती श्रीमंतीत होती. ती कोणाला टाकून बोलत नसे. सर्वांना मदत करी. त्यामुळे सारी तिच्यावर प्रेम करीत. ती जणू त्यांची देवती झाली होती. तिला प्रेमाने गडीमाणसे माईजी अशी हाक मारीत.

मायेचे ओठ जरा हलले.

''तुला काही बोलायचे का आहे?'' रंगरावांनी विचारले.

''तुम्ही लक्षाधीश. पूर्वी आपली ताटातूट झाली, तेव्हा आपण गरीब होतो. मी भिकार्‍याप्रमाणे तुमच्याकडे परत आले, तरी तुम्ही माझा स्वीकार केलात. मला किती धन्य वाटले! तुम्ही सुखी असा.'' ती म्हणाली.

आता कोणी बोलत नव्हते. हेमंत उभे होते. खिडकीतून ते बाहेर बघत होते.

''हेमंत बसा. इथे हेमाजवळ बसा. उभे का? तुम्ही परके नाही हो.'' ती म्हणाली.

हेमंत तेथे संकोचाने बसला. एकेक क्षण युगाप्रमाणे जात होता. आणि शेवटचा क्षण आला.

''हेमा, जपा सारी... राम!'' हेच शेवटचे शब्द. माया देवाघरी गेली. ते अपरंपार वैभव, ते बंगल्यातील सुख गरिबीत वाढलेल्या तिच्या आत्म्याला जणू मानवले नाही.

« PreviousChapter ListNext »