Bookstruck

दुर्दैवी 52

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''भाऊ, मला विचार करू दे. मी का जयंताला, त्या माझ्या पूर्वीच्या बाबांना एकदम विसरू? तुम्ही माझे जन्मदाते. परंतु त्यांनी मला लहानाचे मोठे केले. मला होडीतून न्यायचे. लाटांवर आमची नाव नाचे. बाबा गाणी म्हणत. समुद्रकाठाच्या सुंदर शिंपा, कवडया ते माझ्यासाठी आणीत. माझ्या जीवनात ते आहेत. त्यांना का माझ्या जीवनातून काढून टाकू? मला विचार करू दे. इतकी वर्षे ज्यांना मी माझे जन्मदाते समजत आले. त्यांना एकदम कशी विसरू? आणि तुमचेही म्हणणे बरोबर आहे. मी तुमची असून दुसर्‍याच्या नावाने वावरावे याने तुमच्या पितृहृदयासही वेदना होत असतील. भाऊ, मी काय करू?''

''तू मला भाऊ नको म्हणत जाऊस.''

''का?''

''ते नाव हेमंताने मला दिले आहे. हेमंताचे मला काही नको.''

''मग काय म्हणू?''

''मला बाबा म्हण. मी तुझा पिता आहे. तू माझी मुलगी. हे सुख, हा आनंद मला अनुभवू दे.''

''मी विचार करीन. बाबा. आजची रात्र जाऊ दे. मी सकाळी काय ते सांगेन.''

हेमाच्या डोक्यावर हात फिरवून रंगराव निघून गेले. ते बाहेर गेले. बराच वेळ झाला तरी घरी आले नाहीत. हेमा एकटीच जेवली. ती आपल्या खोलीत गेली नि अंथरुणावर पडली. तिला झोप येईना. ती वरच्या गच्चीत गेली. आकाशातील तार्‍यांकडे ती बघत होती. तो तारा का माझ्या आईचा, तो का माझ्या बाबांचा, परंतु माझे खरे बाबा कोण? ते जयंत, ते माझे खरे बाबा नव्हते. परंतु त्यांनी किती प्रेमाने मला वाढविले. उद्या रंगरावांना मी काय सांगू? तेही माझ्यावर किती प्रेम करतात! ज्या दिवशी मी त्यांना प्रथम ती आईची चिठ्ठी आणून दिली, त्या दिवशी त्यांचे डोळे मला पाहून भरून आले होते. त्यांनी मला द्राक्षे दिली. त्यांनी मला बाळ म्हटले. बेटी म्हटले. मलाही त्यांना उद्यापासून बाबा म्हणू दे. त्यांचे पितृहृदय सुखी होऊ दे. ती खाली गेली. उशीवर डोके ठेवून पडली. तिला झोप लागली.

« PreviousChapter ListNext »