Bookstruck

मिरी 31

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'मी वाघ आहे वाटते ?'

'तू माणूस आहेस म्हणूनच भ्याले. वाघ असतास तर इतकी नसते भ्याले.'

'आई, मिरीला जेवून जायचे आहे ना ? वाढ तर पाने. तिला उशीर होईल.'

'माझी ब्याद लवकर घालवायची आहे वाटते ?'

'सुमित्राताई, वाट बघत असतील, म्हणून हो मिरे. मी घालवू पाहीन ढीग; परंतु तू का जाणार आहेस ? सार्‍या मुलुखाची तू लोचट. खरे ना ?'

'मी लोचट नि तू कोण ?'

यशोदाआईंनी दोघांची पाने वाढली. मिरीचे जेवण लवकर संपले.

'मी जाते रे मुरारी.'

'एकटी जाशील ?'

'जाईन हो. मी भित्री नाही म्हटले.'

मिरी गेली. सुमित्राताई गॅलरीत बसल्या होत्या. मंद शीतल वारा येत होता. फुलांचा सुगंध येत होता. हळूच येऊन मिरी सुमित्राताईंजवळ बसली. वातावरण शांत होते. मिरीही डोळे मिटून तेथे बसली.

'अजून या पोरीचा पत्ता नाही. शेफारुन ठेवली आहे.' आजीबाई खालून ओरडत आल्या.

'येईल हो. मुरारी घरी आला असेल.'

'ही बघा. आली आहे तर खरी, तुमच्याजवळ बसली आहे.'

'केव्हा आलीस मिरे ?'

'थोडया वेळापूर्वी. तुमच्याजवळ डोळे मिटून बसावे असे वाटले.'

'जा बाळ, जेवून घे. मला भूकच नाही.'

'मलासुध्दा नाही.'

'मग जाताना सांगून का नाही गेलीस ? उद्या शिळे खाल्ले पाहिजे.'

'खाईन. मला तर शिळे आवडते.'

'मिरे, दोन घास खा, हवे तर.'

'नको मुरारीकडे थोडे जेवले. यशोदाआई एरवी येऊ देत ना. मग काय करू ?'

'आजीबाई तुम्ही घ्या जेवून. बाबा आज जाणार आहेत कोठे तरी फराळाला.'

आजीबाई गेल्या. मिरी तेथे बसली होती. सुमित्राने तिला जवळ ओढून घेतले. 'तू येथे सुखी आहेस ना ?'

'सुखी आहे. मला काही सांगा.'

'काय सांगू ? चांगली हो; आणखी काय सांगायचे ?'

'चांगली होऊ म्हणजे काय करू ?'

'ज्याची मागून लाज वाटेल असे काही करीत जाऊ नकोस.'

मिरीने त्या लठ्ठ बाईची गोष्ट सांगितली. मुरारीने हात धरून तिला नेले, तेही सांगितले.

'मुरारी खरेच थोर मनाचा मुलगा आहे.'

'त्याची निराशा सुटणार आहे. तो निराश झाला आहे. कोठे जावे निघून, म्हणतो.'

« PreviousChapter ListNext »