Bookstruck

मिरी 32

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'त्याची निराशा टिकणार नाही. प्रेमळ व पवित्र माणसाची निराशा फार वेळ टिकत नाही. जरा कोठे दुसर्‍याचे दु:ख किंवा अडचण दिसताच अशी माणसे धावून जातात. पुन्हा आशावंत होऊन काम करू लागतात. दुष्ट माणसांची निराशा भयंकर असते. परंतु सज्जनांची निराशा पुन्हा आशेलाच जन्म देत असते, सेवेलाच जन्म देत असते.'

निधीगंधाच्या फुलांचा वास येत होता आणि पारिजातकाच्या कळया फुलल्या होत्या. गोड वास. वर अष्टमीचा चंद्र होता. सारी सृष्टी प्रसन्न होती. दूर कोठे तरी भजन चालले होते. एकतारीवरचे भजन.

'आज एकादशी आहे. भजन चालले आहे.'

'सुमित्राताई, तुम्ही एकादशी नाही का करीत ? उपवास नाही का करीत ?'

'मला उपवास सहन होत नाही. लगेच पित्त होते. बेताचे खाणे एवढेच माझे व्रत. कसे सुंदर भजन चालले आहे ! मिरे, तू काहीतरी वाजवायला शीक.'

'शिकू तरी केव्हा ? चित्रकला शिकायची इच्छा होती. परंतु तीही राहिली.'

'तू जात जा चित्रकलेच्या वर्गाला.'

'एखाद्या वेळेस वाटते, कशाला हे सारे सोस ? मुरारी चित्रे सुंदर काढतो. परंतु त्याची कला कारकुनीत मरून जाणार.'

'बाबा आले वाटते, मिरे ? तू आता जाऊन झोप. नाही तर बस लिहीत-वाचीत. मी येथेच बसते. बाबा येतील. त्यांच्याशी थोडा वेळे बोलेन. मग मी जाऊन पडेन. तू जा बाळ.'

मिरी आपल्या खोलीत गेली. ती अंथरुण घालून पडली. मुरारी कोठे जाईल की काय हा विचार तिच्या मनात राहून राहून येत होता. तिला वाईट वाटत होते. केव्हा झोप लागली ते तिला कळलेसुध्दा नाही. स्वप्नात तिला कृपाकाका दिसले. हातात कंदील नि खांद्यावर शिडी असलेले कृपाकाका !

« PreviousChapter ListNext »