Bookstruck

मिरी 48

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'तू कशाला आलीस बाई ? मी दुष्ट चांडाळीण आहे. तुला छळले. तू माझा द्वेष करीत असशील. तिरस्कार करीत असशील.'

'मी द्वेष करणार नाही. मी तुझ्यावरही प्रेमच करीन.'

'खरेच का ? तुला जणू देवाने पाठविले. मी आता वाचत नाही. मध्ये आनंदा, माझा मुलगा, किती वर्षांनी घरी आला होता. त्याचे लग्न केले. ही बघ त्याची बायको. हा त्यांचा लहान मुलगा. परंतु पुन्हा तो गेला घरातून. झाडून होते नव्हते ते घेऊन गेला. खानावळ आता नाही. माझ्याने काम होईना. या जागेत येऊन राहिले. काय खायचे कळत नाही. माझे डोळे मिटू देत आता. तू आलीस. क्षमा कर मिरे.'

'तुला मी कढत चहा करून देते हां !'

मिरी उठली तिने एक भांडे घेतले. रस्त्यावर गेली. तिने दूध, चहा, साखर सामान आणले. तिने चूल पेटवली. आपल्या हाताने चहा केला. आत्याबाईंजवळ जाऊन ती म्हणाली.,

'आत्या, घे कढत कढत घोट. तरतरी वाटेल.'

'दे, तुझ्या हातचा शेवटचा घोट.'

डॉक्टर नि मिरी जायला निघाली. मिरीने त्या लहान मुलाच्या हातात एक रुपया दिला.

'त्याच्या खाऊला.' ती म्हणाली.

बाळाच्या आईने डोळयांना पदर लावला.

'आम्हांला कोणी नाही बाई.' ती म्हणाली.

'देव सर्वांना आहे.' मिरी गंभीरपणाने म्हणाली.

डॉक्टर नि मिरी रस्त्यावर आली. दोघे स्तब्ध होती.

'डॉक्टर, मला त्या खोलीत नेलेत. फार चांगले झाले. माझ्या हृदयातील एक शल्य आज निघाले. द्वेषमत्सरांवर आज विजय मिळाला.'

'मिरे, चल लवकर. आपण समुद्राच्या बाजूने जाऊ. मुरारीची वाट पाहात आजोबा समुद्रावर भटकत असतील. चल; आधीच उशीर झाला आहे.'

« PreviousChapter ListNext »