Bookstruck

मिरी 67

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मिरी निमूटपणे निघून गेली नि सुमित्राताईजवळ बसली.

'सुमित्राताई, तुमच्या कानांवर आले का ते शब्द ?'

'आले नि गेले. जे शब्द हृदयात साठवून ठेवण्याच्या योग्यतेचे असतात त्यांनाच मी आतपर्यंत येऊ देते. बाकीच्यांना बाहेरच्या बाहेर रजा देते. तूही असेच कर. नवीन शाळा देवाने आपल्यासाठी आपल्या या घरात उघडली आहे. भरपूर शिकून घे बेटा.'

दुसर्‍या दिवशी रमाकांत आला तो एकदम वरती आला. मिरी गॅलरीत उभी होती.

'मिराबेन, आजचे माझे कपडे बघा तरी. किती स्वच्छ नि सुंदर आहेत !' तो म्हणाला.

'या कपडयांप्रमाणेच तुम्हीही स्वच्छ, निर्मळ, निरपराधी असतेत तर ? मला भाऊ नाही. एक भाऊ मिळाला असे वाटले असते. ती म्हणाली.

'मी तुम्हाला फूल आणले आहे. कालच्या उपकाराची फेड. हे घ्या.'

'मला नको. त्या फुलापाठीमागे अमंगल वृत्ती आहे.'

'कोणावर प्रेम करणे का अमंगल ?'

'तुम्ही माझ्या वाटेस जात जाऊ नका. लाळघोटेपणा करीत जाऊ नका. तुम्ही खाली जा. तेथे खेळा, हसा, विनोद करा.'

'ठीक. तुम्हांला प्रेमाची किंमत नाही असे दिसते. प्रेमाच प्रेमार्ह आहे. तिलाच मी हे देईन. मी तिच्यासाठी आणले होते, परंतु तुमची गंमत केली. तुमच्यावर प्रेम करण्याइतका मी पागल नाही, मूर्खच नाही. रसिकालाच रसाची चव.' असे म्हणून तो खाली गेला.

'अय्या, रमाकांत ? आज लौकरसे !' लडीने विचारले.

'प्रेमा कोठे आहे ? तिला हे फूल आणले आहे. प्रेमळ आहे ती मुलगी. मला ओढून घेण्यासाठी तिने सारी शक्ती लावली. तिचे हात रक्तबंबाळ झाले.'

'मग तेथे आयोडिन लावायला आणायचे तर हे फूल कशाला ?' मडीने म्हटले.

'अग, त्या फुलात सारी रसायने आहेत.' लडी म्हणाली.

'प्रेमा तिकडे परीक्षेत नापास झाली. परंतु तुमच्या परीक्षेत पास झालेली दिसते.' लडी म्हणाली.

'मला काम आहे. हे फूल प्रेमासाठी ठेवून मी जातो.'

'उद्या येऊ नका रमाकांत. आम्ही एके ठिकाणी वसंतोत्सवास जाणार आहोत.' मडी म्हणाली.

'मलाही तेथे आमंत्रण आहे.' रमाकांतने सांगितले.

'मग तेथे भेटूच. तुमची प्रेमळ प्रेमाही तेथे भेटेल. उद्या तिला गुच्छ आणा, नाही तर माळच घेऊन या.' लडी हसून बोलली.

'इतक्यात माळ नको. काही दिवस फुलाफुलीच बरी, मग फुलांची माळ होईल. एका फुलाची का माळ होते ? बरीच फुले जमली म्हणजे माळ. खरे की नाही रमाकांत ?' मडी म्हणाली.

'मी जातो.'

« PreviousChapter ListNext »