Bookstruck

मिरी 68

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रमाकांत गेला. प्रेमा वाचनालयात गेली होती. ती परत आल्यावर लडी नि मडी दोघींनी तिला भंडावून सोडले. तिच्या केसांत ते फूल त्यांनी घातले. प्रेमा एकटीच वरती जाऊन बसली. तिने ते फूल हातात घेतले. हुंगले, हृदयाशी धरले. 'खरेच का रमाकांतचे आपल्यावर प्रेम आहे ?' असा विचार तिच्या मनात आला. तिला रमाकांत आवडला. इतक्यात मिरी तेथे आली. प्रेमा प्रेमस्वप्नात दंग होती.

'प्रेमा, एकटीच बसलीस ?'

'हातात हे फूल आहे. त्याच्याशी बोलत आहे.'

'तुला का रमाकांतविषयी प्रेम वाटते ?'

'होय, मिरी.'

'त्याचेही तुझ्यावर आहे असे दिसते. तो तसे म्हणाला. अधीर नको होऊस. तो मनुष्य विश्वासार्ह नसावा असे मनांत येते. माझा अंदाज चुकीचा ठरो, अशी प्रार्थना आहे.'

सायंकाळी रमाकांत परत आला.

'कोणी येते का फिरायला ?' त्याने विचारले.

'मला बरे नाही.' मडी म्हणाली.

'माझे कपाळ दुखते.' लडी म्हणाली.

'मिरी कामात आहे. कपडे धूत आहे.' प्रेमा म्हणाली.

'ती स्वत: कपडे धुते ? मोलकरणी नाहीत वाटते ?'

'सुमित्राताईंचे कपडे तीच आपल्या हातांनी धुते. त्यांना इस्त्री करते.'

'मागील जन्मी मोलकरीण होती वाटते ?' लडी म्हणाली.

'या जन्मी तरी ते काम तिला आवडते खरे.' मडी म्हणाली.

'आणि तुमचे कपडे ?' रमाकांतने विचारले.

'आक्का धोब्याकडे देते.' लडी म्हणाली.

'प्रेमा, तू येतेस फिरायला ? का तुझे पाय दुखताहेत ?'

'चला मी येते.'

आणि ती फिरायला गेली.

कपडे वाळत घालून मिरी सुमित्राताईंकडे आली.

'बागेत येता फिरायला ? हात धरून नेते.' ती म्हणाली.

'तू दमली असशील. मिरे, नव्या आईमुळे तुला त्रास. माझे कपडे ती धोब्याकडे देत नाही. तुला धुवावे लागतात. तू इस्त्री करतेस. किती तुला कष्ट ?'

« PreviousChapter ListNext »