Bookstruck

आस्तिक 28

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'तुमचें नांव काय ? तुमचा गांव कोठेंहि नसला तरी तुमचें नांव तरी असेलच. सांगा तुमचें नांव. तें अमर होऊं दे माझ्या जीवनात.' वत्सला म्हणाली.

'माझें नांव नागानंद.' तो तरुण म्हणाला.

'नागानंद वत्सलानंदहि आहे. नागानंद ! सुंदर नांव !  सारीं काव्यें ह्या नांवांत आहेत.  सारें संगीत ह्या नांवांत आहे. कार्तिक, गोड आहे नाहीं नांव ?' तिने विचारिलें.

'जें आपल्याला आवडतें तें गोड लागतें. जो आपल्याला आवडतो त्याचें सारें गोड लागतें.' तो म्हणाला.

'कार्तिकहि सुंदर नांव आहे. कृत्तिका नक्षत्रांचा पुंजका कार्तिक महिन्यांत किती सुरेख दिसतो ! जणूं मोत्यांचा पुंजका, जणूं हिरेमाणकांचा घड ! कृत्तिकांच्या नक्षत्रांकडे मी फार बघत असें. आश्रमांत असतांना मी सर्वांचे आधीं स्नानाला जात असें. स्नान करीत असतांना त्या कृत्तिकांकडक बघत असें ! जणूं पुण्यवान् आत्म्यांची सभाच भरलीं आहे. मला नांव नव्हतें प्रथम माहीत. परंतु आचार्यांनी सांगितलें.' नागानंद म्हणाला.

'तुम्ही का आश्रमांत होतांत ? नागांना आश्रमांत राहणें आवडतें ? ' कार्तिकानें विचारिलें.

'जें जें सुगंधी आहे, पवित्र आहे, स्वच्छ आहे तें तें नागाला आवडतें. नाग सौंदर्यपूजक आहे, संगीतपूजक आहे, सत्यपूजक आहे.' नागानंद म्हणाला.

'किती दिवस होतात आश्रमांत ?' वत्सलेनें विचारिलें.

'होतों कांही दिवस. नंतर सोडून दिला.' तो म्हणाला.

'कां सोडलांत ?' कार्तिकाने विचारिलें.

'सर्व ज्ञानाची किल्ली सांपडली म्हणून.' तो म्हणाला.

'कोणती किल्ली ?' वत्सलेनें विचारिलें.

'प्रेममय सेवा.' त्यानें उत्तर दिलें.

« PreviousChapter ListNext »