Bookstruck

आस्तिक 29

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'म्हणजे काय ?' वत्सलेनें विचारिलें.

'पृथ्वीचें ज्ञान हवें असेल तर तिच्या हृदयांत शिरा. तिला खणा. वृक्षाचें ज्ञान हवें असेल तर त्याला पाणी घाला. त्याच्या जीवनांतील सौंदर्य कळून येईल. ता-यांचे ज्ञान हवें असेल तर प्रेमाने रात्रंदिवस त्यांच्याकडे बघा. माणसांचे अंतरंग समजून घ्यावयाचें असेल तर प्रेमानें त्यांच्या उपयोगीं पडा. नागांत म्हण आहे, 'जमीन पाहावी कसून व माणूस पाहावा बसून.' जमीन चांगली कीं वाईट तें तिची मशागत केल्यानें कळतें. माणूस चांगला कीं वाईट तें त्यांच्या सान्निध्यांत राहिल्यानें कळते.  नुसतें सान्निध्य नको, स्नेहमय सान्निध्य हवें, तरच अंतरंग प्रतीत होतें.' नागानंद म्हणाला.

"तुम्हांला काय काय येतें ?' कार्तिकानें विचारिलें.

'मला महापुरांत पोहतां येतें, मला तीर मारतां येतो, भाला फेंकतां येतो, मला शेती करतां येते, बांसरी वाजवितां येते, फुलें फुलवितां येतात. वेलीच्या व गवताच्या सुंदर टोपल्या करतां येतात. आश्रमांत असतांना मीं तेथील गुरुदेवांना एक गवताची परडी विणून दिली होती. किती सुकुमार मजेदार होतें तें गवत !' नागानंद म्हणाला.

'कोणीं शिकविलें टोपल्या करायला !' कार्तिकानें विचारलें.

'माझ्या आईनें.' तो म्हणाला.

'तुमच्या आईनें आणखी काय शिकविलें तुम्हांला ?'कार्तिकाने प्रश्न केला.

'दुस-यासाठी मरायला, दुस-यासाठी श्रमायला.' तो म्हणाला.

'कोठें आहे तुमची आई ?' वत्सलेने विचारलें.

'नागलोकीं गेली. देवाघरी गेली.' तो म्हणाला.

'कशानें मेली ती ?' तिने कनवाळूपणानें विचारलें.

« PreviousChapter ListNext »