Bookstruck

आस्तिक 105

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'सौम्यपणा आतां संपला. माझें पत्र जाळणा-यांस मी जाळीन. पत्राचा सत्र सुरु करून सूड घेतों. सर्पसत्र सुरू करतों. नागांना जाळण्याचें सत्र !' जनमेजय म्हणाला.

'महाराज, नागांनीं आपलें सैन्य ठार केलें. आणि सारे नाग आतां इंद्राच्या आश्रयार्थ गेले.' वार्ताहरानें वार्ता दिली.

'काय, इंद्राने आमच्या शत्रूस आश्रय दिला ? ' जनमेजय क्रोधानें म्हणाला.

'राजा, तूं आतां उग्र रूप धारण कर. इंद्राला खरमरीत पत्र लिही. इतरहि सामंतांना नागांच्या बाबतींत कडक धोरण स्वीकारण्याविषयीं लिही. त्यांचे गुळमुळीत धोरण असतें असें कळतें. ' वक्रतुंड म्हणाला.
'सर्व नागांना पकडून येथेंच पाठविण्याविषयी लिहितों. येथें करूं त्यांची होळी. त्या बावळटांना नागांना शिक्षा करण्याचें धैर्य होणार नाहीं. येथेंच उभारूं सहस्त्रावधि तुरुंग.  प्रत्यहीं काढूं बळी. घेऊं पुरा सूड. असेंच करतों.' जनमेजय म्हणाला.

'फारच चांगलें. सा-या नागांच्या मुसक्या बांधून येथें आणूं. गांवोगांव तुझे राजपुरुष जाऊं देत, सैनिक जाऊं देत.' वक्रतुंड म्हणाला.

'इंद्रांशी युध्दच करावलें लागेल.' जनमेजय म्हणाला.

'करूं युध्द. सारें सामंत आपापलीं सैन्यें घेऊन तुझ्या बाजूनें उभें राहतील.  त्यांना ससैन्य सिध्द राहण्याविषयीं लिही. ' वक्रतुंड म्हणाला.

विचार करून जनमेजयानें इंद्राला पत्र लिहिलें. तें पत्र घमेंडीचें होतें. सत्तच्या उन्मादाचें होतें.

'महाराज इंद्र यांस,
नागजातीचे लोक माझ्या राज्यांतून आपल्या आश्रयाला गेले आहेत, असें कळतें. वास्तविक आमचें व नागांचें वैर आहे हें जाणून आपण त्यांना आश्रय दिला न पाहिजे होता.  नागांची दुष्ट जात क्षमार्ह नसून हननार्ह आहे. त्यांनी माझें शासन मोडलें; एवढेंच नाहीं, ती मीं पाठविलेलें पत्र सभा भरवून तुच्छतेनें जाळलें माझें पत्र जाळणा-या जातीची मीहि होळी करण्याचें ठरविलें आहे.  नागांचा नि:पात करण्याची मीं प्रतिज्ञा केली आहे. तुमच्या घराण्याचें व आमचे पूर्वापार संबंध फार स्नेहाचे आहेत. आपला घरोबा फार व ऋणानुबंधहि तसाच आहे. माझे पणजोबा आपल्या राजधानींत राहून नृत्यादि कला शिकते झाले, नाना शस्त्रास्त्रें संपादिते झाले. नरवीर पार्थांचा महिमा सर्वांस ज्ञात आहे. आणि त्यांची माता कुंती. त्यांच्या प्रतसमाप्तीप्रीत्यर्थ  तुमच्या घराण्याकडूनच श्वेतवर्ण ऐरावत पाठविण्यात आला होता. असे आपले संबंध. त्या संबंधांत वितुष्ट येऊं नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. आपण नागांना आश्रय द्याल तर फसाल. ते तुमच्यावरच उलटतील. माझ्या पूज्य पित्याचा त्यांनी कसा विश्वासघातानें वध केला ती हकीकत तुम्हांला ज्ञातच आहे. असों तरी नागांस पत्रदेखत निष्कासित करावें. कळावें.

महाराजाधिराज जनमेजय'

« PreviousChapter ListNext »