Bookstruck

आस्तिक 106

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जनमेजयाच्या पत्रानें इंद्र घाबरला नाहीं. त्यानें प्रमुख नागांना बोलावून त्यांच्याशीं विचारविनिमय केला. एकजात सारे नाग इंद्राच्या पाठीशीं उभे राहायला तयार होते. 'मणिपूर वगैरे नागराज्येंहि इंद्राच्याच बाजूनें उभी राहतील' असें नागनायकांनी सांगितलें. शेवटीं युध्दाचीच पाळी आली तर नाग सर्वस्व अर्पण करण्याच्या तयारीनें उठतील, अशी त्यांनी ग्वाहीं दिली. इंद्राने जनमेजयास उत्तर दिलें.

'राजाधिराज जनमेजय यास,

निराधारांस आधार देणें, आश्रयार्थ आलेल्यांस आश्रय देणें हें आमचें कुलव्रत आहे. इतके दिवस झालें. नाग व आर्य यांचे संबंध तितक्या विकोपाला कधींहि गेले नव्हते. उलट दोन्ही समाज जवळ येत होते. सरमिसळ होत होती.  दोघांची एक संमिश्र अशीं सुंदर संस्कृति बनत चालली होती. तुम्ही काळाच्या प्रवाहाविरुध्द जाऊं पाहात आहांत. असें कराल तर फसाल. फुकट श्रम होईल.  आपण जें धोरण स्वीकारलें आहे तें आर्यांना शोभेसें नाही. 'एक सद् विप्रा बहुधा वदन्ति' असे म्हणणा-या आर्यांना आपले प्रस्तुतचें धोरण पाहून दु:ख होईल.  संग्राहक व सहानुभूतीचें धोरण स्वीकाराल व सर्वत्र शांति प्रस्थापित करण्याचे प्रयत्न कराल, अशी मला आशा आहे. आर्य व नाग यांच्यात स्नेहसंबंध निर्मिण्याचें काम जर आपण अंगावर घ्याल, तर मी त्यांत सर्वस्वी साहाय्य देईन.

आपला   
इंद्र'   

जनमेजयाला तें पत्र मिळालें. ते पत्र त्यानें पायाखालीं चुरडलें. 'इंद्रासह नागांची होळी करतों' अशी त्यानें गर्जना केली. 'इंद्राच्या मुसक्या बांधून आणून ह्या होळींत फेकतों' असें तो म्हणाला. त्यानें इंद्राशी युध्द करण्याचें ठरविलें. सर्व अंकित राजांना सैन्यें घेऊन येण्याविषयीं पत्रें लिहिलीं गेली. तिकडें इंद्रहि स्वस्थ बसला नाहीं. त्यानेंहि सिध्दता केली होती. ठिकठिकाणचे नाग इंद्राच्या राजधानींत येत होते. मणिपूरचा राजा इंद्राच्या साहायार्थ सिध्द झाला.  नागांना इंद्राविषयीं कृतज्ञता वाटली. इंद्राचें चतुरंग दल सिध्द झाले.

पुन्हां महाभारत होणार का ? पुन्हां कुरूक्षेत्र होणार का ? पुन्हां लक्षावधि लोक एखाद्या व्यक्तीच्या हट्टासाठीं रणकुंडांत पडणार का ? पुन्हां लक्षावधि स्त्रिया पतिहीन होणार का ? मुलें पितृहीन होणार का ? पुन्हां शोकसागर घरोघर उसळणार का ? काय होणार ? जनमेजयाच्या आसुरी अहंकाराला कोण घालणार आळा ? हा महान् संहार कोण थांबवणार ?  कोणांत आहे शक्ति ?

स्वत:च्या साम्राज्यांतून व सामंतांच्या राज्यांतून सारे नाग भराभरा इंद्राकडे जात आहेत, हे कळतांच जनमेजय दांतओठ खाऊं लागला. त्यानें पुन्हां कडक आज्ञापत्रें लिहिलीं. गांवोगांवचे नाग बध्द करून राजधानींत पाठविण्याविषयीं अधिका-यांना कळविण्यांत आलें. नागांना घरे सोडण्याची सर्वत्र बंदी झाली.  नागांचे जथे राजधानीस येऊं लागले. कारागृहे भरून जाऊं लागली.

« PreviousChapter ListNext »