Bookstruck

आस्तिक 109

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'आज कृष्णीला पुरेशी फुलें मिळालीं नाहींत, म्हणून रडत बसली आहे. ती रोज रानांती देवाला हार नेऊन वाहते.  आम्हां नागांवर संकट येऊं नये म्हणून रोज रात्रीं जाते, पूजा करते, प्रदक्षिणा घालते व येते. आज माळा नीट होणार नाहींत. मला म्हणाली, 'वत्सलेचया आजीकडे जा. त्यांच्याकडे मिळतील फुलें.' आहेत का फुलें ? ' ती म्हणाली.

'शेतावर किती तरी फुलें ! कार्तिक, यांना दे रे टोपलीभर आणून. वत्सलेला फुलांचे वेड असे. तुमच्या मुलीलाहि आहे वाटतें ?' सुश्रुतेनें विचारलें.

'गांवांतील मुलींबरोबर पोहायला शिकत असे तीच ना तुमची मुलगी ? ' कार्तिकानें विचारिलें.

'हो.' ती म्हणाली.

'ब-याच वर्षांत ती दिसली नाहीं येथें.' तो म्हणाला.

'ती होती आजोळीं. परंतु येऊन झाले कांही महिने. देवपूजेचा अलीकडे लागला आहे तिला नाद.' ती म्हणाली.

'मोठी झाली असेल आतां.' कार्तिकाने विचारलें.

'हो, उंच झाली आहे चांगली. राजाची राणी शोभेल.' ती म्हणाली.

'मी देतों फुलें आणून.' असें म्हणून कार्तिक गेला.

कृष्णीची आई निघून गेली.

'कुठें आहेत फुलें ? हात हलवीतच आलीस ?' कृष्णी म्हणाली.

'ते कार्तिक आणून देत आहेत शेतावरून. तुझी त्यांना आठवण आहे. तुम्हांला पोहायला शिकवीत वाटते ? ' आईनें विचारलें.

'हो. ते मला नाहीं म्हणत नसत. आर्यकन्यांबरोबर मलाहि शिकवीत. परंतु किती तरी वर्षे झालीं त्याला. तेवहां मी होतें लहान. तेहि फार मोठें नव्हते. मग ते आश्रमांत गेले. मी आजोळी गेलें. ते आतां मोठे झाले असतील. त्यांचे वडील नागांचा द्वेष करीत. परंतु मला त्यांनी एकदां गोड फळें दिलीं होतीं. त्यांना आठवणसुध्दां नसेल.' कृष्णी म्हणाली.

« PreviousChapter ListNext »