Bookstruck

आस्तिक 123

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कार्तिक--वत्सले, ही हो माझी कृष्णी.

वत्सला--केवढी झाली कृष्णी ? कृष्णे, तूं इतकी वर्षे कोठें लपली होतीस ?

कृष्णी--वेळेवर येण्यासाठीं.

सुश्रुता--कृष्णे, बघूं तुझा हात ? केवढा आला आहे फोड ! खरी शूर हो तूं.

नागानंद--कसला फोड ?

कार्तिक--राजपुरुषांनी जळतें लाकूड 'तुमची होळी करूं' असें दाखविण्यासाठीं आणलें होतें. कृष्णीनें ते आढून घेंतलें व स्वत:च्या हातावर ठेवून ती म्हणाली, 'कोणाला घालता भीति ? सती जाणा-या स्त्रिया आगीला भीत नाहींत. निखा-यांना फुलें समजून त्या ओंजळींत घेतात.'

वत्सला--(कृष्णीला हृदयाशी धरून) खरी नागकन्या. नागपूजेनें असें धैर्य येत असेल तर ती कोण त्याज्य म्हणेल ?

कार्तिक--आज सारें गोड झालें. आपल्या गांवातील भेद मिटलें, कृष्णीनें स्वत:च्या हातावर निखारें ठेवले व गांवातील द्वेषावर निखारा ठेवला गेला. माझी आईहि तुमच्याबरोबर येण्यास तयार झाली आणि बाबा आमच्याबरोबर येणार.

कृष्णी--आपण आतां आपल्या घरीं जाऊं. वडिलांचे आशीर्वाद घेऊं.

सुश्रुता--हें काहीं परक्याचे घर नाहीं.

कृष्णी-- तसें नाहीं मी म्हटलें. आजी, मी तुमचीच आहें. आम्ही तुमचींच आहोंत.

कार्तिक व कृष्णी कार्तिकाच्या घरीं गेलीं. कार्तिक आईला म्हणाला. 'आई, ही तुझी सून. तुला आवडतें की नाहीं सांग.' आईनें तिला पोटाशी धरिलें. 'धन्य आहेस तूं.' ती म्हणाली. नंतर दोघें पित्याच्या पायां पडली. कार्तिक वडिलांस म्हणाला, 'बाबा, मुलावर राग नका करूं.' वडील म्हणाले, 'तुम्ही मुलेंच बरोबर असतां. तुम्हाला दूरचें दिसतें. आम्हांला जवळचेहिं दिसेनासें होतें. खरेखर आम्ही आंधळे होतो. आशीर्वाद आहे तुम्हाला. तुम्ही मरायला निघतां, आणि आम्ही मरतुकडयांनी का घरीं राहावें ? वास्तविक आम्ही सर्व वृध्दांनी ती जनमेजयाची होमकुंडे भरून टाकली पाहिजेल. तुम्ही सुखाचे संसार क्षणांत फेंकून आगीला कवटाळायला निघालांत. धन्य तुम्ही मुलें ! तुमच्याजवळच खरा धर्म आहे; खरा देव आहे. आम्ही वृध्दांनी उगीच काथ्याकूट करावा. आशीर्वाद, तुम्हाला शत आशीर्वाद. या पोरीनें हातावर कोलीत ठेवलें-- माझ्या हृदयावर निखारे पडल्यासारखें झालें. अशी रत्नें--त्यांना आम्ही 'नाग' 'नाग' म्हणून नीच मानतों. आम्हीच खरोखर नीच. कृष्णें, मुली, धन्य तुझी मायबापें !  धन्य माझा कार्तिक--ज्याला तुझी जोड मिळाली !'

« PreviousChapter ListNext »