Bookstruck

आस्तिक 124

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कार्तिक आईला म्हणाला, 'आम्हीं जरा जाऊन येतों.'

आई-- 'जा. लौकर या. शेवटचें घरीे जेवूं व बाहेर पडूं.'

कार्तिक व कृष्णी बाहेर पडलीं. ती शेतावर निघाली. कार्तिकाने कृष्णीचा भाजलेला हात आपल्या हृदयावर ठेवला होता. कोणी बोलत नव्हतें. दोघें शिलाखंडावर बसलीं.

'मी दूध काढतों हां !' कार्तिक म्हणाला.

'काढा. मी खोलींत जरा पडतें.' ती म्हणाली.

कार्तिक दूध काढायला गेला. कृष्णी कार्तिकाच्या पलंकडीवर पडली होती. ती रडत होती. तिला हुंदके आवरतना. कार्तिक आला. त्याला हुंदके ऐकू आले. तो तिच्याजवळ बसला. तिचें डोंकें मांडीवर घेऊन बसला. तिचे अश्रु त्याने पुसलें. छे: ! ते कसे पुसले जाणार ?  सागराला कोण बांध घालणार ?

'कृष्णे, काय झालें ? ' त्यानें विचारलें.

'काय सांगू ?  दोन दिवसहि आपणांस एकत्र येऊन झाले नाहींत, आणि आतां आपण जाणार ? कोठें आपण पुन्हां भेटूं ?  आगीत तरी एकदम लौटतील का आपणांला ?  आपणांस बध्द करतील, नेतील, छळतील, मारतील जाळतील. तुमच्या मांडीवर एकदांसुध्दा डोकें नाहीं ठेवलें. तुम्हांला काय दिलें मी ?  मरण-मरण. कार्तिक, मी अकस्मात् आलें व तुम्हाला आगींत लोटलें. काय करूं मी ?  कां नाहीं आपण गेलों पळून, कां नाहीं गेलों निघून ? राहिलों असतों जंगलांत. खाल्ली असतीं पानें. ऐकली असतीं पांखरांची ज्ञानें. पल्लवांची केली असती मऊमऊ शय्या. रानफुलें पसरलीं असतीं तीवर. मी तुम्हांला वनमाळांनी नटविलें असतें. तुमच्याबरोबर नाचलें असतें. आपण झाडाच्या एका फांदीवर पांखरांप्रमाणे बसलों असतों. झोके घेतलें असतें. प्रेमाचाझोला प्रेमाचे जीवन परंतु आता काय ?  तुम्ही जाणार प्रचाराला, आम्हीहि जाणार. जिवंतपणीं उभयंतांचे हातीं सतींचे वाण. नाहीं तुम्हांला दिलें सुख, नाहीं पोटभर पाहिलें मुख. काय करू मी ?' ती रडूं लागली. रडे थांबेना.

'कृष्णे, तूं मला सारें दिलेंस. जीवनाची कृतार्थता दिलीस. जीवनाची अनंतता दाखविलीस. मरणाला मित्र मानायला शिकवलेंस. रडूं नको. दोनच दिवस. परंतु किती सुगंध ओतलास माझ्या जीवनात ! तो मला पुरेल.  जन्मोजन्मीं पुरेल. रडूं नको.  हंस.  तूं आतां एकटी नाहींस. मी एकटा नाहीं. आपली कोण ताटातूट करील ? तुझ्याबरोबर मी आहें. माझ्याबरोबर तूं आहेस. चल आपण जाऊं.

« PreviousChapter ListNext »