Bookstruck

आस्तिक 125

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आपल्या क्षुद्र सुखाचा विचार का आतां करायचा ? नवधर्म आपण आणीत आहों. तिकडें कोठेंसें सांगतात कीं, बीं पेरण्याआधीं जमीन जाळावी लागतें. त्याप्रमाणें नवधर्माचें बीं पेरण्यापूर्वी बलिदानें अर्पावी लागतील. मग सुंदर अंकुर फुटेल. आपली जीवनें धन्य होतील, आणि ही धन्यता मला तूं देत आहेस. मी का पुरुष होतों. भ्याड होतो. तूं मला वीर केलेस. तूं गावांतील सर्व स्त्री-पुरुषांत नवस्फूर्ति ओतलीस. सर्वांना नवजीवन दिलेंस. सर्वांच्या जीवनांत राम आणलास. रडूं नकों आपला संसार कृतार्थ झाला. नवीन ध्येयाचें बाळ तूं सर्वांना वाढवायला दिलेंस. खरें ना ? ' तो तिचा हात हातांत घेऊन म्हणाला.

ती शांत पडून होती.

'हाताची आग होते का ? ' त्यानें विचारिलें.
'तुम्ही आपल्या हृदयावर तो धरून ठेवला होतात. मग आग थांबणार नाहीं का ?  तुमचे हृदय प्रेमसिंधु आहे.' ती म्हणाली.

'तूं त्या दिवशीं माझें भाजलेंलें बोट एकदम तोडात धरून ठेवलेंस. किती गं तुम्हां बायकांचें प्रेम ! आमचें कमी हो प्रेम. पुरुषी प्रेम शेवटीं उथळच. '

'असें नकां म्हणूं. तुम्ही पुरुष संयम राखतां. तुमच्याजवळ प्रेम कमी असतें असें नाहीं.' ती म्हणाली.

'चला, आपण जाऊं.' तो म्हणाला.

'चला, आपली वाट पाहात असतील.' ती म्हणाली.

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली.  गांवोगांव प्रचार होऊं लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद् गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ति अपूर्व आहे. तिला एकदां जागृत केलें कीं महान् कार्यें होतील. स्त्रियांच्या मनांत एकदां एखादी गोष्ट रुजली कीं ती लौकर मरत नाहीं.

कामरूप देशांत तर स्त्रीराज्यच होतें. तिकडूनहि शांतिसेना आली. लोकांना आश्चर्य वाटलें. महान् यात्राच जणूं सुरू झाली. सत्यधर्माची यात्रा, प्रेमाची गाणीं. विश्वेक्याची गाणीं, मानव्याचीं गाणीं सर्वत्र दुमदुमून राहिली. वक्रतुंडाचा वांकडा धर्म ना कोणी ऐके, ना कोणी मानी.
जनमेजयाकडे एका राजाचें सैन्य चाललें होतें. त्या सैनिकांत उत्साह नव्हता. कसे तरी जात होते. तों वाटेंत ही स्त्रियांची शांतिसेना आली. त्या सैनिकांसमोर ही सेना उभी राहिली. संसारांत नाना आपत्तींशी झगडणा-या त्या थोर स्त्रिया तेथें सत्याच्या विजयार्थ धैर्यानें उभ्या होत्या. त्यांच्या हातांत शांतीच्या पताका होत्या. 'ॐ शांति: शांति: शांति:' असे पवित्र शब्द त्या पताकांवर लिहिलेले होते. नाग व आर्य एकमेकांस मिठी मारीत आहेत, अशींहि चित्रें काहिंच्या पताकांवरून होती. 'मानवधर्माचा विजय असो', 'सत्यधर्माचा विजय असो' अशी ब्रीदवाक्यें त्या भगिनी गर्जत होत्या.

« PreviousChapter ListNext »