Bookstruck

आस्तिक 129

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मातीचा कणहि गोड आहे. मातीचा कण, तो का क्षुद्र ? जरा पाऊस पडतांच त्यातून सुगंध बाहेर पडतो,हिरवें गवत बाहेर पडतें. फुलाफळांतील अनंत रंग व अनंत रस हे कोठून आहे ? त्या मृत्कणांतून. केवढी थोर दृष्टि ! '  असें म्हणून पुन्हां आस्तिक

'मधु वाता ऋतायते
मधु क्षरन्ति सिन्धव:
माध्वी: गावो भवन्तु न:'
हे मंत्र म्हणूं लागले. एकीकडे ते शशांकाला थोपटीत होते. शशांकाचा डोळा लागला.

'तुम्ही जा. आतां मी बसतों.' नागेश येऊन म्हणाला.

'सर्वांची झालीं का जेवणें ? तूं जेवलास का पोटभर ?' त्यांनी हंसून विचारिले.
'मला मुलें हंसतात म्हणून मी हल्ली थोडेंच खातों. सारे मला चिडवतात.' नागेश म्हणाला.

'तूं माझ्याबरोबर जेवत जा. वेडा कुठला मुलांनी चिडविलें तर आपण त्यांना चिडवावें. बरे बस.' ते म्हणाले.

आस्तिक निघून गेले. आश्रमांत आज कांही ऋषिमंडळीं येणार होती. सद्यस्थितीवर विचारविनिमय होणार होता. आस्तिक अंगणांत फे-या घालीत होते. मुलें झोपलीं होतीं. नागेश शशांकाजवळ होता.

आस्तिक !  केवढें मंगल नाम ! मानव्यावर विश्वास ठेवणारा तो खरा आस्तिक, देवधर्मांवर विश्वास ठेवून मनुष्यांना तुच्छ मानणारा, तो का आस्तिक ? स्वत:ची जात श्रेष्ठ, स्वत:चे राष्ट्र श्रेष्ठ, स्वत:चा धर्म श्रेष्ठ, बाकी सर्व तुच्छ, असें मानणारा का आस्तिक ?       

त्या काळांतील तो एक खरा महान् आस्तिक तेथें फे-या घालीत होता. त्या आश्रमांतून आस्तिक्याचे, श्रध्देचे, मांगल्याचें, त्यागाचे वारें भरतवर्षभर जात होते. तेथून नवतरुणांना स्फूर्ति मिळत होती. नवनारींना चेतना मिळत होती.  ह्या सर्व नवप्रचारांना आस्तिकांचा आधार होता. सर्वांच्या पाठीमागें ही थोर विभूति होती. सर्वांना ओलावा देणारी ही ज्ञानगंगा होती. सर्वांना प्रकाश देणारी ही चित्कला होती.

प्रत्येक युगांत अशी युगविभूति उत्पन्न होत असते. ह्या विराट् संसाराचा हळूहळू विकास होत आहे. एकेक पाकळी शतकांनीं उघडते.  एखादें युग येते व समाजपुरुषाचें एखादें कवच गळून पडतें.  आंतील मांगल्याची मूर्ति संपूर्णपणें दिसूं लागण्यापूर्वी किती कवचें गळावीं लागतील ! किती शतके लागतील ! परंतु होईल हळूहळू सारें. त्या त्या शतकांत एखादी दुष्ट रूढि गळते, एखादा पूर्वग्रह जातो, एखादा दुष्ट आचार बंद होतो, असें चाललें आहे.

या मानवी समाजाचें अंडे सारखें उबवलें जात आहे. संतांच्या तपानें त्या अंडयाला ऊब मिळतें. कोंबडीचीं अंडी पटकन् उबविली जातात.  पिलें बाहेर येतात. परंतु कुंपणावरूनहि त्यांना उडतां येत नाही. पक्षिराज गरुडाचें अंडें विनता माता सहस्त्र वर्षें उबवीत होती. तेव्हां त्यांतून तो प्रतापी गरुत्मान् बाहेर पडला. चिश्वंभराला पंखांनी सहज नाचविता झाला. हा कोण गरुड? हा कोठला गरुत्मान् ? ही विनता माता कोण?

« PreviousChapter ListNext »