Bookstruck

आस्तिक 130

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मानवी जीव म्हणजे हा गरुड पूर्णत्वाला मिठी मारूं पाहणारा जीव. परंतु गरुड व्हायचें असेल तर वाट पाहावी लागेल. विनता म्हणजे आपल्या विनम्र वृत्ति. विनम्र वृत्तीनें काम होईल. घाईनें काम होणार नाहीं. विनम्र होऊन ध्येयावर अविचल दृष्टि ठेवून तप करावयाचें. तप म्हणजे तनमनेंकरून केलेला प्रयत्न. शरीरानें, मनानें, बुध्दीनें श्रमणें म्हणजे खरे तप.

असे तपस्वी, मनस्वी संत मानवी परिपूर्णतेला ऊब देत असतात. आस्तिक असेच एक ऊब देणारे होते. एक दिवस परिपूर्णतेला मानवी पक्षी मिठी मारील.

इतक्यांत आश्रमांत ऋषि आले. आस्तिक त्यांना सामोरे गेले. कुशल प्रश्न झाले. हस्तपादप्रक्षालन झालें. थोडासा फलाहार देण्यांत आला. मुलें झोंपली होती. स्वत: आस्तिकच व्यवस्था ठेवीत होते. नंतर सर्वजण बाहेर अंगणांत बसले. बकुळीच्या फुलांचा वाय येत होता.

'फुलांचा मधुर सुवास सुटला आहे.' हारीत म्हणाले.

'त्या त्या ऋतूंत तीं तीं फुलें.  सृष्टीची विविधता अपूर्व आहे.  विविधतेमुळें आनंद आहे. जीवनाला एक प्रकारची सदैव नवीनता राहते.' दधीचि म्हणाले.

'परंतु तीच विविधता आज कोणी नष्ट करूं पाहत आहेत. जें भाग्य आहे त्याला दुर्भाग्य कोणी म्हणत आहेत. आर्यांना नाग नकोसे वाटत आहेत.जनमेजय हट्टाला पेटला आहे. उपाय काय करावा ? पुन्हां का मोठे युध्द होणार ? कांही कळत नाहीं.' यज्ञमूर्ती म्हणाले.

'प्राचीन काळीं दधीचींनी जें केलें तेंच आजहि आपण करूं या. त्यांनीं हाडें दिलीं, स्वत:चीं हाडें दिली. त्यांचे शस्त्र करून इंद्रानें वृत्र मारिला. वृत्रावर दुसरी कोणतीहि शक्ति चालेना. सर्व त्रिभुवनाला वृत्र व्यापून टाकीत होता, परंतु त्याला कोण अडवणार ? तपोमूर्ति दधीचींनीं आपलें बलिदान केलें. तीं त्यांची हाडें मग त्या इंद्रानें घेतलीं. याचा अर्थ काय ? त्या चिमूटभर हाडांत का इंद्राच्या वज्रापेक्षां अधिक सामर्थ्य होतें ? होय. त्यांत अनंत त्याग होता.  मानवजातीबद्दलचे प्रेम त्यांतून भरलेलें होतें. हुतात्म्या दधीचीचीं तीं हाडें बघताच वृत्र विरघळला; वृत्राला इतका धक्का बसला कीं तो मरून पडला.  'त्यागेन एकेन अमृतत्वमानशु: ।' त्यागानें सारें मिळेल. आणि आपली निर्मळ जीवनें अर्पिणें याहून कोणता त्याग  ? माझ्या तर मनांत असें येतें आहे कीं स्वत: नमेजयासमोर जाऊन उभें राहावें. त्यानें नागांना आगींत टाकण्याचें सुरू केलें आहे. त्याला त्यानें सर्पसत्र असें नांव दिलें आहे. जणूं नाग लोक म्हणजे सापच ! या नागांना जाळून का परमेश्वर संतुष्ट होणार आहे ? जनमेजयाचा अहंकार संतुष्ट होईल. जनमेजयाचे डोळे निर्मळ करण्यासाठीं आपण आपलीं जीवनें होमूं या. त्याच्या त्या नरमेघांत आपण आपली आहुति अर्पू या.  आश्रमांतील पुष्कळसे छात्रहि माझ्या बरोबर येणार आहेत. परंतु मी त्यांना घरी पाठविणार आहें. 'आईबापांकडे जाऊन मग काय तें करा.' असें त्यांना सांगणार आहें. मला निघावेसें वाटतें. वाटेंत समानधर्म आणख्ी मिळतील.  जनमेजयावर मोठा परिणाम होईल. पर्वतालाहि फोडण्याचें सामर्थ्य नि:स्वार्थ बलिदानांत आहे, आपण होऊन केलेल्या जीवनार्पणात आहे.' आस्तिक म्हणाले.

« PreviousChapter ListNext »