Bookstruck

आस्तिक 136

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'तुम्हीं वेंचलें नाहीं ? ' शशांकाने विचारिलें.

'भरपूर वेंचलें. त्यांतच तूंहि पुढें सांपडलास. धरून ठेवलेल्या, हृदयाच्या पेटींत भरून ठेवलेल्या, सोन्यांतच पुढें तुझी चिमुकली मूर्ति मिळाली. सोन्याची मूर्ति  ! 'माता त्याला कुरवाळून म्हणाली.

'मी का सोन्याचा ? तर मग हें सोनें खरें कीं खो तें आगींत घालून पाहीन. पाहूं ना, आई ? 'त्याने विचारिलें.

'पाहा.' माता म्हणाली.

'बाबा, बांसरी वाजवायला नाहीं शिकलों मी येथें. तुम्ही जगाला ऐकवतां, मला कधीं ऐकवणार ? येथें करा ना वेणुवादन. मी ऐकेन, सारे आश्रमवासी ऐकतील.' शशांक म्हणाला.

'तूं बरा हो, मग ऐकवीन. आज नको.' नागानंद म्हणाला.

'बरा नाही झालों तर--' त्यानें विचारिलें.

'बरें, वाजवतों.' नागानंद म्हणाले.

'सर्वांनाच ऐकवा.' तेथें पाठीमागें येऊन उभे राहिलेले आस्तिक म्हणाले. सर्व मुलें जमली.  आस्तिक तेथें मुलांतच बसले. नागानंदानें बांसरी वाजविली. गोड गीत त्यानें वाजविलें. मुलांना बसवेना, ती नांचू लागली. हातांत हात घेऊन नाचूं लागलीं.  शशांक नागांच्या फणेसारखी फणा करून बसता राहिला.

थांबली वेणु.

'कल्पना आली आम्हांला. तुम्ही जनतेला कसें वेड लावीत असाल तें कळलें. मुसळांना अंकुर फोडणारें, पाषाणांना पाझर फोडणारें संगीत ! ' आस्तिक म्हणाले.

'बांबूच्या बांसरींतून मधुर सूर काढणें सोपें आहे.  जीवनाच्या बांसरींतून काढील तो खरा. भगवन्, आपलें जीवन म्हणजे अमर मुरली. ती सारखी संगीतच स्रवत आहे.' नागानंद म्हणाला.

« PreviousChapter ListNext »