Bookstruck

आस्तिक 137

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नागानंद व वत्सला जायला निघालीं. शशांकाला त्यांनी प्रेमाश्रूंचे न्हाण घातलें.

'भगवन्, आम्ही जातों.' नागानंद म्हणाला.

'गुरुमाउली आहे माझ्या बाळाला. या माउलीची जरूरी नाहीं.' वत्सला म्हणाली.

'मातेच्या प्रेमसिंधूंतील एका बिंदूत कोटि कोटि आस्तिक वाहून जातील.' आस्तिक म्हणाले.

आस्तिक पोहोचवायला गेले. दोघें पायां पडली. आस्तिकांनी आशीर्वाद दिला. जलांन्तापर्यंत पोंचवून ते माघारे आले. आश्रमांतील मुलें गंभीरपणें उभी होतीं.

'आजारी मुलगा टाकून आईबाप जातात हें आजच पाहिलें.' एक छात्र म्हणाला.

'आणखीहि पुष्कळ न पाहिलेल्या गोष्टी लौकरच पाहाल.' आस्तिक म्हणाले.

नागानंद व वत्सला यांच्या पातळीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमांत दोघें गेली आहेत, हें त्याला कळलें होतें. ससैन्य दबा धरून तो वाटेंत बसला होता. त्यानें एकदम दोघांना पकडलें. त्यांना बांधण्यांत आलें. वक्रतुंडाला अन्यानंद झाला. जनमेजयासमोर हे दोन बंडखोर केव्हां उभे करीन असें त्याला झालें होतें.

हस्तिनापुराला या दोन राजबंदींसह रात्रीच्या वेळीं ते आले. नागानंद व वत्सला यांना एका कोठडींत ठेवण्यांत आलें. शेजारच्या कोठडयांतून शेकडों नाग स्थानबध्द करून ठेवण्यांत आलेले होते. आणखी अभागीजीव आले असें वाटून त्यांना वाईट वाटत होते. परंतु पहारेवाल्यांकडून वत्सला व नागानंद दोघें आलीं आहेत, असें कळतांच सर्व राजबंदींनीं 'वत्सला-नागानंदकी जय' अशा गर्जना केल्या. परंतु वत्सला व नागानंद यांनी पहारेक-यांबरोबर निरोप पाठविला : 'जयजयकार आमचा नका करूं. जयजयकार आस्तिकांचा करा. त्या महर्षींचा करा. जयजयकार प्रेमधर्माचा करा. ऐक्यधर्माचा करा.'

सर्व राजबंदीनीं 'भगवान् आस्तिकांचा विजय असो !  प्रेमधर्माचा विजय असो ! ' अशा गर्जना केल्या. त्या गर्जना जनमेजयाच्या कानीं गेल्या. आज कां या गर्जना. हें त्यांच्या लक्षांत येईना. इतक्यांत वक्रतुंड आला.

'आणलें दोघांस पकडून.' तो ऐटीनें म्हणाला.

'त्यामुळेंच का ह्या जयगर्जना ? त्यांना पाहून इतर बंदी गर्जना करीत आहेत वाटतें.' जनमेजयानें विचारिलें.

'बेटयांना मरण जवळ आहे तें दिसत नाहीं. आतां गर्जत आहेत, मग ओरडतील, रडतील.' वक्रतुंड म्हणाला.

« PreviousChapter ListNext »