Bookstruck

भूत बंगला 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वालजी मोकळा झाला. तो पोलिस अधिकारी बाहेर खुर्ची टाकून बसला होता. त्याच्यासमोर खोलीतील एकेकाला जबानीसाठी नेण्यात येत होते. इतक्यात, त्या मुलीही आल्या. त्यांनाही पकडण्यात आले. ते चार खुनी, खाणावळवाला, त्याची बायको आणि हिरी या सर्वांना हातकडया घालण्यात आल्या. छबी, तिची लहान बहीण व भाऊ यांना सोडण्यात आले.

'आता त्या खुर्चीतील माणसाला आणा.' अधिकारी म्हणाला. पोलिस आत आले, तो वालजी कुठं आहे? तेथे वालजी नव्हता. तो भूत बंगला होता. भुताटकी झाली काय? कोठे गेला वालजी? तो अधिकारी आत आला. तो खिडकीतून दोरखंड खाली सोडलेले आढळले. सारे स्पष्ट झाले. वालजी पळून गेला. क्षणभर ते सारे पोलिस व तो अधिकारी चकित झाले! परंतु तो अधिकारी निघून गेला. पोलिस त्या कैद्यांस घेऊन गेले.

त्या अधिकार्‍याने सर्व शहरभर घोडेस्वार पोलिस पाठवले. त्या रात्रीच्या वेळी घोडेस्वार हिंडू लागले. वालजीचा शोध होऊ लागला. नाक्यानाक्याला पोलिस होते. वालजी घरी गेला. त्याने झोपलेल्या लिलीला उठविले. तिला उचलून तो एकदम निघाला. तो ज्या रस्त्याने जात होता, तिकडून घोडेस्वार येत होते. तो पुन्हा वळला. एका पुलाखाली लपला. पुन्हा बाहेर पडला. एका अज्ञात रस्त्याने तो निघाला. फारशी रहदारी तिकडे नव्हती. पुन्हा घोडयांच्या टापांचा आवाज. वालजी पळत सुटला. रस्त्याच्या डाव्या बाजूला लांबच लांब भिंत होती. लिलीला पाठुंगळीस घेऊन कंदिलाच्या खांबावर तो चढला. 'लिल्ये, त्या भिंतीवर चढ.' तो म्हणाला. भिंतीकडे पाठ करून तो कंदिलाच्या खांबावर होता. लिलीने भिंत पकडली. नंतर तो भिंतीवर चढला. त्याने खिशातील दोरी लिलीला बांधून तिला खाली सोडले. त्याने उडी टाकली. भिंतीजवळ आत दोघे बसली.

'लिल्ये, लागलं नाही ना कुठं?' त्याने हळून विचारले.

'नाही.' ती त्याला बिलगून बसली.

« PreviousChapter ListNext »