Bookstruck

महात्मा गौतम बुद्ध : || दोन || 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कर्माचा जो हा कठोर कायदा, त्याचेही एक तारक असे सुंदर रूप आहे. कर्माच्या या कायद्यामुळे अंगावर काटा उभा करणा-या भेसूर नरकाग्नीच्या छाया नष्ट होतात. शासन भोगण्याचे, कष्ट भोगण्याचे कोणतेही स्थान कायमचे नाही. स्वर्ग किंवा नरक सान्त व नाशिवंत वस्तूंतच अंतर्भाव होतो. स्वर्गसुखे व नरकयातना कितीही दिर्घकाळ टिकणा-या व उत्कट असोत, एक दिवस त्यांचा अंत होईल. त्यांचा अंत केव्हा, कधी, कसा व्हायचा ते आपणावर अवलंबून आहे. प्रत्येक नीच प्रवृत्तीला तिच्यावर संस्कार करून उच्च बनविणे, प्रत्येक क्षुद्र हेतूस ताब्यात ठेवणे, हीनदीन करणा-या प्रत्येक प्रकारच्या दुबळेपणास जिंकून घेणे, अशा रीतीने प्रयत्न करीत गेले पाहिजे. कर्माच्या कायद्याचा असा मात्र अर्थ नाही कराता कामा, की जगातील दु:ख वा दारिद्र्य हा ज्याच्या-त्याच्या कर्माचा परिणाम असल्यामुळे आपणास त्याच्याशी काही कर्तव्य नाही. जर कोणास असे वाटेल, सर्व सजीव सृष्टीचे जे व्यापक बंधुत्व, त्याचे विशाल प्रतिबिंब जर कोणाच्या हृदयात पडणार नसेल, तर त्याच्या बाबतीत कायदा कठोरता दाखविल. दया व क्षमा यांचा कर्ता होण्याचे जो नाकारतो. त्याच्या बाबतीत ही कर्माचा कायदा निष्ठुर होईल. हा जो कर्माचा कायदा तो कोणा अधिष्ठात्री देवतेकडून चालविला जात असतो. लहरी देवदेवतांचे गोंधळात पाडणारे बंड येथे नाही. ‘ईश्वरी अन्याय’ असले गूढ शब्दप्रयोग येथे नाहीत.

मनुष्यप्राणी म्हणजे रुप, वेदना, संज्ञा यांचा संघात आहे. रुप म्हणजे हा देह, ही इंद्रिये, शरीराची हालचाल करण्याची शक्ति. वेदना म्हणजे भावना; संज्ञा म्हणजे विचार. तसेच ज्या पंच विषयांच्या द्वारा आपण बाह्य जगाशी परिचित होतो, त्यांचाही अंतर्भाव यात आहे. आण् आजच्या आपल्या वृत्ती, आवडीनिवडी, नानाविध शक्ती ज्या भूतकालीन कर्मातून निर्माण झालेल्या संस्कारामुळे आपणास प्राप्त झालेल्या असतात, त्या संस्काराचाही वरील संघतांत समावेश असतो. या संस्कारांमुळेच पूर्वजन्मातील सत्कर्माचा वारसा या जन्मी आपणास प्राप्त होत असतो. आणि या सर्वांच्या डोक्यावर ते विज्ञान असते. हे विज्ञान आपल्या सर्व मानसिक क्रियाकर्माना व्यापून असते. इंद्रियगम्य कल्पनेपासून तो इंद्रियातील ध्यानापर्यंत या विज्ञानाचा पसारा व प्रभाव असतो.

« PreviousChapter ListNext »