Bookstruck

महात्मा गौतम बुद्ध : || चार || 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बुद्धांचे उद्दिष्ट अत्यंत व्यावहारिक होते. ते आपल्या श्रोत्यांना नाना तर्कटे व कल्पना रचायला प्रवृत्त करीत नसत. ते आत्मसंयमनास प्रवृत्त करीत. ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पाहिजे आहेत, परंतु बुद्धी ज्यांची उत्तरे शब्दांत देऊ शकत नाही, त्या प्रश्नांचे ज्ञान ‘माझ्या मार्गाने या व स्वत:च मिळवा’ असे ते सांगत. बुद्ध म्हणतात, ‘आपल्या विचारशक्तीवर ताबा मिळवून जर तिचा आपण नीट उपयोग करु, जर आपण हृदय शुद्ध करु, वासनांना नीट वळण देऊ, तर सदगुणांची दैवी प्रभा आपल्याभोवती पसरल्याशिवाय राहणार नाही. निष्कलंक जीवनातच, निष्कलंक हृदयमंदिरातच ते परिपूर्ण शिवत्व, तो शाश्वत धर्म स्थापणे शक्य होईल. जो पाहील त्याला ते दर्शन घडेल.’ काशीला एका प्रवचनात ते म्हणाले, ‘माझ्या शिकवणीप्रमाणे जर वागाल, तर याच जन्मात तुम्ही सत्याचे आकलन करु शकाल, त्या सत्याचा साक्षात्कार करुन घ्याल.’ अशा श्रद्धेने व अधिकारवाणीने बोलणा-या बुद्धांना अज्ञेयवादी कोण म्हणेल?

बुद्ध जरी नाना प्रकारच्या बुद्धिहीन भोळ्या विश्वासांच्या बाबतीत, नानाविध खुळ्या समजुतींच्या बाबतीत आक्षेप घेत असत, तरी विश्वातील नैतिक व्यवस्थेविषयी त्यांनी कधी शंका घेतली नाही. आत्मिक जीवनाचे महत्त्व ते मानीत. आत्मिक जीवनाची जी सर्वश्रेष्ठ सत्यता, तिच्याविषयी त्यांनी कधी शंका घेतली नाही. सदगुणांच्या प्रत्यक्ष आचरणावर ते फार भर देत असत. बुद्धांची कसोटी लावूनच कोणतेही मत घ्या असे ते सांगत. ते असे का सांगत? काहीतरी उत्कट अशी, निश्चित अशी नि:शंकता त्यांच्याजवळ होती. त्यांच्याजवळ नि:शंक असे सत्यज्ञान होते. नीतीधर्माचा, सद्गुणाचा कायदा हेच त्यांचे परब्रह्म, हीच त्यांची अंतिम सत्यता. मानवी आशा व धडपड यांना हेच त्यांचे उत्तर. ज्या तत्त्वावर जगाच्या सर्व अस्तित्वाचा पाया उभारलेला आहे ते हेच तत्त्व. इतिहासाचा अर्थ तो हा यातच सर्व सृष्टीचा उद्धार आहे.

बुद्धांना सत्यज्ञान झाले होते असे मानण्यावाचून गत्यंतर नाही. त्यांच्या शेकडो उद्गारांवरून तसे मानणे प्राप्त आहे. पुरावा सांगतो, की असे मानले पाहिजे. परंतु असे जर होते, तर त्या सत्यज्ञानाची त्यांनी घोषणा का नाही केली? त्यांना प्राप्त झालेले सत्य अनीश्वरवादी तर नव्हते? परब्रह्म म्हणून काहीतरी आहे, असे धर्ममय अनुभव घेणारे सांगतात. परंतु अशा धर्मपर व्यक्तींचा तो महान अनुभव घेणारे सांगतात. परंतु अशा धर्मपर व्यक्तींचा तो महान अनुभव खोडून काढण्यासाठी, त्या अनुभवांचे महत्त्व कमी करण्यासाठी म्हणून बुद्धांचे शब्द देण्यात येत असतात. निर्वाण म्हणजे, ‘अनंत रात्रीतील अनंत निद्रा’ नव्हे का? निर्वाण म्हणजे ईश्वरावाचून स्वर्ग, आत्म्यावाचून अमरता, प्रार्थनेवाचून पावित्र्य.

« PreviousChapter ListNext »