Bookstruck

महात्मा गौतम बुद्ध : || चार || 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

जे कोणी त्या पवित्र पर्वताच्या शिखरावर चढतात, त्यांची मुखमंडले तेजाने चमकतात. एक दिव्य प्रभा त्यांच्या तोंडाभोवती पसरते. मोगल्लान सारिपुत्राला म्हणाला, “तुझी बुद्धी निर्मळ झालेली दिसते, नि:शंक दिसते. मित्रा, तुझ्या शरीराचा रंगही किती सुंदर व निर्मळ आहे. तुला अमृतत्व तर नाही ना मिळाले?” निर्वाण ही याच जन्मात प्राप्त करुन घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि या निर्वाणाचा बौद्धिक व सामाजिक कर्माशी विरोध नाही. निर्वाणात अहंची जाणीव, स्वत्वाची जाणीव संपूर्णपणे नष्ट होते. एकदा दोन शिष्य बुद्धांना म्हणाले, “भगवन जो ज्ञानी झाला तो सर्व बंधनातीत असतो. त्याने जीवनाची सारी बंधने तोडलेली असतात. मी अमुक होईन, तमुक होईन, अशी आशा-आकांक्षा त्याला नसते. माझ्यापेक्षा कोणी अधिक चांगला, कोणी कमी चांगला, किंवा कोणी माझ्याबरोबरीचा अशा प्रकारची जाणीव त्याला नसते.” बुद्ध म्हणाले, “जे खरी नाणी आहेत, तेसुद्धा अशाच रीतीने ज्ञानाचे स्वरुप वर्णितात. परंतु ‘अहं’विषयी ते बोलत नाहीत. आपण काय मिळविले ते ते सांगतात. परंतु आत्म्याच्या बाबतीत ते मुके असतात.”

निर्वाण हे भौतिक नाही. या पृथ्वीशी, या मर्त्य जगाशी त्याचा जणू संबंध नाही. कारण ज्यांना निर्वाण प्राप्त होते ते जन्म-मरणाची खंतच बाळगीत नाहीत. त्याविषयी ते उदासीन असतात. निर्वाण स्वत:बरोबर परमोच्च सुखालाही घेऊन येत असते. थेर व थेरीगाथा यांतील बहुतेक काव्याला निर्वाणाने प्रेरणा दिली आहे. मरताना या शरीराचे काय होते? ज्याला निर्वाण मिळाले त्याचे जीवन सर्वस्वी संपले का? की या इंद्रियगम्य जगाजवळचाच फक्त त्याचा संबंध संपतो, आणि ती जी खरी सत्यता, तेथील अस्तित्वाचा आनंद तो मुक्तात्मा अनुभवू लागतो? या प्रश्नाचे उत्तर बुद्ध देऊ इच्छित नाहीत. ते टाळतात. निर्वाण म्हणजे केवळ शून्याकार असे मानावयास धार्मिक ग्रंथातील पुरावा मिळणे फार कठीण आहे. बुद्धधर्माच्या ग्रंथातून जेथे जेथे पावित्र्याच्या परमधन्य स्थितीचे अत्यंत वक्तृत्वपूर्ण वाणीने वर्णन केलेले असते, तेथे ते वर्णन म्हणजे का मरणाचे, जीवनाच्या अभावाचे वर्णन? असे असणे शक्य नाही. निर्वाण म्हणजे शून्यता नव्हे, अभाव नव्हे, उदात्त व उच्च मार्गाचे प्राप्तव्य म्हणजे निर्वाण. निर्वाण म्हणजे वासना-विकारांपासून स्वातंत्र्य. निर्वाण म्हणजे अखंड शांती, चिरशांती. देवही ज्याची आशा-आकांक्षा करतात असे जीवन म्हणजे निर्वाण. असे हे निर्वाण शून्यमय कसे असू शकेल? स्वत:चे अलग अस्तित्व राखणारी सारी बंधने गळून जाणे म्हणजे निर्वाण. ज्या ज्या गोष्टींमुळे आपण भेदभाव निर्मितो त्या सर्व गोष्टींना तिलांजली देणे म्हणजे निर्वाण.

« PreviousChapter ListNext »