Bookstruck

महात्मा गौतम बुद्ध : || चार || 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

निर्वाण म्हणजे दिक्कालातीत अशा अनंततेतील, अशा सर्वात्मकतेतील स्थिर असे जीवन. पूर्वीच्या जीवनाचे हे केवळ शुद्धिकरण नसते, तर आजच्या व मागच्या सर्व आकारांचे, सर्व स्वरुपांचे ते समाप्तीकरण असते. निर्वाण म्हणजे जे येथे या क्षणी आहे, त्याहून काहीतरी भिन्न असे जीवन. ज्या वेळेस मृत्यूहीन, अंतहीन, चांचल्यहीन अशी विशेषणे आपल्या या क्षणीच्या जीवनास उद्देशून योजिलेली नसतात, तर परिपूर्ण स्थितीची ती निदर्शक असतात; पूर्ण पुरुषास, मुक्त पुरुषास लावलेली ती विशेषणे असतात. ‘ज्याला ते अमृतत्व लाभले त्याला कोणते माप मापू शकेल? ज्या अर्थी जीवनाचे सारे आकार तेथे विलीन होतात, त्या अर्थी वाणीचेही सारे मार्ग तेथे खुंटतात.’

अग्गि-वच्छगोत्त सूत्तामध्ये म्हटले आहे, की इंधन संपताच ज्वालाही संपते, त्याचप्रमाणे वासना-विकार नष्ट होताच जीवनाचे जळण संपते. परंतु दृष्य अग्नी विझणे म्हणजे संपूर्ण विनाश नव्हे. फक्त विषयवासना विझते. अशांतीची आग विझते. पसेनदि नावाच्या राजाला भिक्षुणी खेमा म्हणते, “राजा, बुद्धदेवांनी हे सारे विवरण करुन सांगितलेले नाही.”

“बुद्धांनी का नाही सांगितले?” राजा विचारतो.

“राजा, तुला मी एक प्रश्न विचारते व तू त्याचे उत्तर दे. गंगेच्या वाळूचे कण मोजील असा कोणी तुझ्याजवळ आहे का? असल्यास सांग.”

“हे पवित्रे, असा माझ्याजवळ कोणी नाही.”

“राजा, समुद्राचे पाणी इतके आहे असे मोजून सांगणारा कोणी तुझ्याजवळ आहे का?”

“हे पवित्रे, असा माझ्याजवळ कोणी नाही.”

“का बरे नाही?”

“कारण, हे पवित्रे, सागर अनंत आहे, अगाध आहे.”

“राजा, त्याप्रमाणेच ज्या शरीरामुळे तथागताचे तुम्ही वर्णन करु शकता ते शरीर नष्ट होते. उन्मळून पडलेल्या ताडाच्या झाडाप्रमाणे शरीर शून्य होऊन पडते. ते भविष्यकाळी पुन्हा उठत नाही. नामरुपापासून मुक्त झालेला, देहापासून मुक्त झालेला, हा तथागत, सागराप्रमाणे गहन-गंभीर, अगाध, अनंत असा असतो.”


« PreviousChapter ListNext »