Bookstruck

जमीनदार व त्याचे दोन मुलगे 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“दादा, भावाचा असा का रे कंटाळा करतोस? तुझ्याशिवाय मला करमत नाही. मी कुठे गेलो तरी तुझी आठवण येते, आणि पुन्हा मी तुला भेटायला येतो. आज बरेच दिवसांनी आलो तरीही मला पाहून तुला आनंद का होत नाही?” ठकसेनाने विचारले.

“ठकसेन, बाबांना तू आवडत नाहीस, म्हणून मलाही तू आवडत नाहीस. तू वाटेल तसा वागतोस. उधळपट्टी करतोस. तुला ताळतंत्र नाही. आपल्या घराण्याचा मोठेपणा तुझ्या लक्षात येत नाही. सारे लोक तुला हसतात, नावं ठेवतात. तुझबरोबर मी राहीन तर मलाही नावं ठेवतील.” संपत म्हणाला.

“दादा, तुझं माझ्यावर प्रेम नसलं तरी माझं तुझ्यावर आहे. मला जे लागतं ते मी फक्त तुझ्याजवळ मागतो. तू नाही नाही म्हणतोस परंतु मला देतोस. तू वरून नाही दाखवलीस तरी मनात माझ्याबद्दल तुला सहानुभूती आहे. दादा, आज मी अडचणीत आहे. मला तीनशे रुपये पाहिजेत. दे, कोठूनही दे. नाही म्हणू नकोस.” ठकसेन हात धरून म्हणाला.

“कुठून देऊ पैसे? मागे दिले होते. आज पुन्हा कुठून देऊ? बाबांना हिशेब द्यायचा आहे. सोड. जाऊ दे मला.” संपत रागाने म्हणाला.

“मी तुझा हात सोडणार नाही. तू माझा दादा. तू माझा मोठा भाऊ. तुझा आधार मी कसा सोडू? दादा, तू पैसे दिलेच पाहिजेस. मला नाही देणार? तुझी ती गोष्ट,- हं. मी कोणाला ती सांगणार नाही. दादाची गुप्त गोष्ट मी कशी कोणाला सांगू? दादा म्हणजे कुळाचं भूषण, कुळाची कीर्ती, खरं ना? मी तुझी गोष्ट माझ्या पोटात ठेविली आहे. परंतु मला पैसे दे. फक्त तीनशे. आज अधिक नकोत.” ठकसेन हसत म्हणाला.

“घे बाबा. तू तरी एक माझ्या मानगुटीस बसलेला गिर्‍हाच आहेस. पुन्हा नको मागू.” संपत म्हणाला.

“पुन्हा लागले म्हणजे मागेन. दादाजवळ नाही मागायचे तर कोणाजवळ? गिर्‍हा म्हण, भूत म्हण, काही म्हण. पैसे देत जा म्हणजे झालं. तुझी गोष्ट मी कधीही कोणाला सांगणार नाही, खरं ना?” असे म्हणून ठकसेन निघून गेला.

« PreviousChapter ListNext »