Bookstruck

जमीनदार व त्याचे दोन मुलगे 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ठकसेनाचे उपद्व्याप सारखे चाललेले असत. त्याने कुबेराला भिकेस लाविले असते. खावे, प्यावे, चैन करावी यापलीकडे त्याला कर्तव्य नव्हते. तो रायगावात फारसा राहात नसे. पैसे घेऊन बाहेर जाई. तिकडे चैन करावी, रंगढंग करावे. पैसे संपले की तो घरी परत येई. तो वडिलांना कधी तोंड दाखवीत नसे. परंतु वडील भावाच्या पाठीस लागत असे. आणि काय असेल ते असो, वडील भाऊ त्याला भीत असे. ठकसेनाच्या हातात वडील भावाच्या जीवनाची कोणती तरी एक कळ होती. त्यामुळे दादापासून त्याला पैसे उकळता येत.

ठकसेन तीनशे रुपये घेऊन गेला. परंतु तीन महिनेही त्याला झाले नाहीत, तो तो पुन्हा आला, पैशासाठी पुन्हा दादाच्या खनपटीस बसला.

“दादा, मला पाचशे रुपये हवेत या वेळेला.” तो म्हणाला.

“दादाला वीक आता व घे पैसे.” संपत म्हणाला.

“दादाला कसं विकू? दादाची घोडी आहे ती फार तर विकीन. तुझी घोडी? विकली तर पाचशे रुपये सहज मिळतील. देतोस मला तुझी घोडी? दे. उद्या बाजारात विकीन. दादा, तू माझा आधार. आणि तुझी ती गोष्ट मी कोणाला ती सांगणार नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे. खरचं.”ठकसेन कावेबाजपणे हसून म्हणाला.

“घोडी कशी विकायची?” संपत संतापून म्हणाला.

“कशी म्हणजे? बाजारात. मी विकीन. तू नको येऊ. तुला तो कमीपणा वाटेल. नेऊ ना तुझी घोडी?” त्याने पुन्हा विचारले.

“बाबा काय म्हणतील?” संपत खिन्नतेने म्हणाला.

“जरा रागावतील. मग गप्प बसतील. मी घेऊन जातो घोडी. उद्या गुरांचा बाजार आहे शेजारच्या गावी. तिथं विकीन. माझी अडचण भागेल. माझं तुझ्यावर प्रेम आहे. खरचं.” असे म्हणून ठकसेन निघून गेला.

शेजारच्या गावी गुरांचा बाजार भरला होता. सुंदर सुंदर घोडे तेथे विक्रीसाठी आणलेले होते. ठकसेनही घोडी घेऊन उभा होता. ती घोडी आसपास प्रसिद्ध होती. पूर्वी अनेकांना ती घोडी विकत घेण्यासाठी खटपट केली होती. परंतु संपतरायाने ती कधीही दिली नाही.

घोडीभोवती लोकांची गर्दी झाली.

“हजार रुपये मागं एकजण देत होता. घोडी म्हणजे घोडी आहे.” ठकसेन म्हणाला.

“कोणाला पाहिजे तुमची घोडी? पाचशेसुद्धा कुणी देणार नाही.” एकजण म्हणाला.

“आपली वस्तू आपण होऊन बाजारात आणली म्हणजे तिची किंमत कमी होते.” दुसरा कोणी म्हणाला.

« PreviousChapter ListNext »