Bookstruck

जमीनदार व त्याचे दोन मुलगे 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

इतक्यात एकाएकी वादळ उठले. गार वारा वाहू लागला. आकाशात ढग जमले. अंधार अधिक दाटला. ठकसेन झपझप चालू लागला. मनू विणकराची झोपडी आली. झोपडीचे दार उघडे होते. आत चुलीत मंदाग्नी पेटत होता. दिवा मिणमिण करीत होता. परंतु मनू कोठे होता? तेथे नव्हता. आपले द्रव्य सोडून तो कोठे गेला?

ठकसेनाने आत डोकावून पाहिले. आत कोणी नव्हते. तो पटकन झोपडीत शिरला. परंतु तेथे त्याला पेटीविटी दिसेना. कोठे आहे तो कृपणाचा ठेवा? ठकसेन पाहू लागला. तो त्या मागाजवळ गेला. तेथे त्याला उखळलेले दिसले. त्याने भराभर माती उखळली. भुसभुशीत होती माती. थोडीशी माती काठताच हाताला त्या दोन पिशव्या लागल्या. ठकसेनाने त्या बाहेर काढल्या. हेच ते द्रव्य. जड होत्या पिशव्या. त्याने त्या पिशव्या उचलल्या. माती नीट करून ठेवून तो बाहेर पडला. अंधारात निघून गेला.

बाहेर वादळ फारच जोरात सुरू झाले. कडाड मेघ गरजू लागले. गाराही पडू लागल्या. मोठ्या आंब्याएवढाल्या गारा. गारांचा पाऊस. असा पाऊस कधी पडला नव्हता. मनू बाहेर गेला होता. दोरा विकत आणण्यासाठी गेला होता. सकाळी नवीन ठाण लावावयाचे होते. त्यासाठी दोरा हवा होता म्हणून तो गेला होता. तो तिकडेच अडकला. आपण पटकन घरी येऊ असे त्याला वाटत होते. कडी न लावताच तो गेला होता. त्याच्या घराची सर्वांना भीती वाटे. कोणीही त्याच्या वाटेस जात नसे. आपल्या घरी कोणी चोर येईल अशी शंकाही मनूच्या मनात कधी येत नसे.

वादळ जरा थांबले. गारांचा वर्षाव थांबला. पाऊस पडतच होता. मनू घरी येण्यास निघाला. पावसातून भिजत तो घरी आला. दुसरे कोरडे नेसून तो चुलीजवळ गेला. तो गारठला होता. आता ऊब आली. त्याने जेवण केले आणि झोपडीचे दार लावून, खिडक्या लावून तो आपल्या त्या ठेव्याजवळ आला. मिणमिण करणारा दिवा जवळ होता.

मनू माती उकरू लागला. नेहमीप्रमाणे त्याने माती दूर केली. परंतु पिशव्या कोठे आहेत? पिशव्या नाहीत. तो घाबरला. त्याने हातभर खणून पाहिले, दोन हात खणले. परंतु पिशव्या नाहीत! त्याने सर्वत्र पाहिले. कोपरान् कोपरा शोधला. परंतु सोने नाही. कोठे गेले सोने. पंधरा वर्षे प्रेमाने साठविलेले सोने. बाहेरच्या गारठ्याने मनू गारठला नाही. परंतु पैशाची ऊब नाहीशी होताच तो कापू लागला. आपले प्राण जाणार असे त्याला वाटले. त्याने आपले हृदय घट्ट धरून ठेवले. छाती फुटणार असे त्याला वाटले. तो मध्येच डोळे फाडफाडून पाही. मध्येच तो डोळे मिटी. ‘माझं सोनं, माझं सोनं-’ असे म्हणून तो रडू लागला.

« PreviousChapter ListNext »