Bookstruck

जमीनदार व त्याचे दोन मुलगे 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पाऊस थांबला होता. परंतु मनू विणकराच्या डोळ्यांतून पाऊस पडत होता. आकाश निर्मळ झाले, परंतु मनूचे हृदय अंधाराने भरले. तो वेड्यासारखा झाला. ‘माझं सोनं, माझं सोनं-’ करीत तो झोपडीच्या बाहेर पडला. दिगंबररायाकडे दाद मागावी असे त्याच्या मनात आले. रडत रडत तो निघाला. दिगंबरराय आज घरी नव्हते. त्यांचा मोठा मुलगा संपतराय तोही घरी नव्हता. ते शेजारच्या कोणत्याशा गावी मेजवानीला गेले होते, त्यांच्या घरी गडीमाणसे होती. कारभारी होते. त्यांच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या. कोणी खेळत होते.

इतक्यात “माझं सोनं गेलं, माझे प्राण गेले. द्या हो माझं सोनं. आणा हो शोधून. कसं गेलं माझं सानं? कोणी नेलं?” असे ओरडत मनू तेथे आला. वाड्यातील सारी मंडळी तेथे जमली. त्यांना आधी काही कळेना. सारा गोंधळ.

“हे पाहा मनू, नीट सारं सागं.” प्रमुख म्हणाला.

“काय नीट सांगू? मी दोरा विकत आणण्यासाठी बाजारात गेलो होतो. पावसामुळं दुकानात मी अडकलो. परंतु पाऊस संपताच घरी गेलो. घरी जाऊन माझी पिशवी पाहतो तो नाही. दोन पिशव्या होत्या. दोनशे बहात्तर मोहरा होत्या. लवकरच तीनशे झाल्या असत्या. कितीदा तरी या बोटांनी मी त्या मोजीत असे. माझी मोहर मी अंधारातही ओळखीन. गेल्या, सार्‍या गेल्या. तुम्ही जा. शोधा चोर, कुठं गेला चोर? काय करू मी? माझा सारा आनंद गेला. माझी शक्ती गेली. छे! पायानं चालवत नाही. आणा हो माझ्या पिशव्या.”

असे म्हणून तो म्हातारा विणकर तेथे मटकन खाली बसला. त्या सर्वांना त्याची कीव आली. मनूने कधी गोडगोड खाल्ले नाही. चांगले वस्त्र ल्यायला नाही. गाडीघोडा ठेवला नाही. चैन त्याला माहीत नव्हती. दिवसभर तो काम करी. काम करून त्याने पैसे जमविले. निढळाच्या श्रमाचे पैसे. परंतु सारे गेले. त्या पैशांचा काय होता त्याला उपयोग? परंतु ते जवळ असणे, त्यांचा स्पर्श बोटांना होणे, त्यांचे दर्शन डोळ्यांना होणे, यातच त्याचा आनंद होता. पैशाचा दुसरा उद्देश नव्हता. दुसरे प्रयोजन नव्हते. ते पैसे म्हणजे मनूबाबाचे एक प्रेमाचे जणू स्थान होते.

“तुम्हांला कोणाचा संशय येतो का?” त्या प्रमुखाने विचारले.

“हा तुमचा येथील गडी भिकू याचा मला संशय येतो. तो मागे एकदा म्हणाला होता, की तुझे पैसे चोरले पाहिजेत. याला विचारा.” मनू म्हणाला.

भिकू एकदम संतापला.

« PreviousChapter ListNext »